नाशिक (Nashik) : पर्यटन विकास मंत्रालयाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात जूनमध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी बहुतांश कामांवरील स्थगिती सप्टेंबरमध्ये उठवण्यात आली. त्यात सिन्नर तालुक्यातील ३२ कोटींच्या कामांचा समावेश होता. शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित ठेकेदारांनी ही कामे मंजूर करून आणलेली असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी पर्यटन विकास विभागाला या कामांमध्ये बदल करण्यासाठी व जिल्हा परिषदेला याबाबत टेंडर प्रक्रिया न राबवण्याबाबतही पत्र दिले होते. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या कामांबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. दरम्यान पर्यटन विकास विभागाने आता या कामांमध्ये बदल करण्याची आमदार-खासदार द्वयींची विनंती मान्य केली असून या दोघांनी ठेकेदारांनी मंजूर करून आणलेली निम्मी निम्मी कामे वाटून घेतली आहेत. यामुळे या दोघांच्या विनंतीनुसार कामांमध्ये बदल केला असून खासदार हेमंत गोडसे यांना १५.५० कोटी व आमदार माणिकराव कोकाटे यांनी १५.२५ कोटींची कामे विभागून देण्यात आली आहेत.
महाविकास आघाडी सरकार जून २०२२ मध्ये अल्पमतात आल्यानंतर पर्यटन विकास मंत्रालयानेही मोठ्यासंख्येने कामांना मंजुरी दिली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने १९ व २५ जुलैस आदेश काढून एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. या स्थगिती दिलेल्या कामांमध्ये पर्यटन विभागाची १३२६ कोटींची कामे होती. या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती मार्च २०२३ मध्ये उठवण्यात आली होती. दरम्यान पर्यटनविकास मंत्रालय गिरीश महाजन यांच्याकडे आल्यानंतर पर्यटन विकास विभागाने ९ व १२ सप्टेंबरला शासन निर्णय प्रसिद्ध करून जवळपास ४४८ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली. दरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन सिन्नर तालुक्यातील कामांमध्ये बदल करायचा असल्यामुळे टेंडर प्रक्रिया सुरू न झालेल्या कामांबाबत पुढील कार्यवाही करू नये, असे पत्र दिले. आमदार कोकाटे यांनी कामात बदल झाल्याशिवाय या कामांबाबत कार्यवाही करू नये, असे उपमुख्यमंत्री कार्यालयीन उपसचिवांचे पत्र आणल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी २९ सप्टेंबरला पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहून सिन्नर तालुक्यातील १५ कोटींच्या दहा कामांमध्ये कोणतेही बदल करू नये व त्या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची विनंती केली. दरम्यान खासदार गोडसे यांनी जिल्हा नियोजन समितीला आणखी एक पत्र देऊन आधीच्याच पत्र दिलेल्या कामांमध्ये बदल करायचे असल्याचे म्हटले. यामुळे आमदार व खासदार यांचे पत्र व पर्यटन मंत्र्यांच्या सचिवांकडून येणारे फोन यामुळे नेमका कोणता निर्णय घेऊ, अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची झाली होती.
अशी झाली वाटणी अन् शह-काटशह
अखेर पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी तोडगा काढत सिन्नर तालुक्यातील ३२ कोटींच्या कामांपैकी ३०.७५ कोटींची कामे आमदार माणिकाराव कोकाटे व खासदार हेमंत गोडसे या दोघांमध्ये वाटून दिली. त्यात आमदार कोकाटे यांना १५.२५ कोटींचा, तर खासदार गोडसे यांना १५.५० कोटींचा निधी मिळाला आहे. त्या निधीनुसार या दोघांनी नवीन कामे सुचवली आहेत. आमदार कोकाटे यांच्या पत्रानुसार १५.२५ कोटींची नऊ कामे रद्द करण्यात आली असून त्या कामांच्या बदल्यात तितक्याच रकमेच्या २० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. खासदार गोडसे यांनी १५.५० कोटींची कामे रद्द केली व तो निधी आमदार कोकाटे यांनी रद्द केलेल्या नऊ पैकी सात कामांना दिला आहे. यामुळे आमदार कोकाटे यांनी राजकीयदृष्ट्या नकोशा असलेल्या गावांमधील कामे रद्द करून तेथे शह देण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासदार गोडसे यांनी इतर ठिकाणची कामे रद्द करून नेमके त्या रद्द केलेल्या कामांना निधीची तरतूद करून आमदार कोकाटे यांनी काटशह दिल्याचे बोलले जात आहे.