नाशिक (Nashik) : इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनमधील १० पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत, पूर्ण झालेल्या योजनांमधून नागरिकांना पाणी मिळत नाही, अनेक पाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरी फेल गेल्या आहेत, अशा तक्रारी मांडत आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली. काम झाल्यानंतर त्याची शहनिशा न करता वेळ छायाचित्र बघून देयके काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमदार खोसकर यांच्या तक्रारींची दखल घेत श्रीमती मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभागातील दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करत या दोन तालुक्यांमधील कामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व योजनांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दीपक पाटील यांनी पाहणी सुरू केली आहे.
आमदार खोसकर यांनी बुधवारी (ता. १७) मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांची भेट घेतली. यावेळी जलजीवन मिशनच्या कामांबाबत असलेल्या तक्रारींचा पाढा त्यांनी वाचला. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सेंद्रीपाडा येथील योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील रहिवाशांना केवळ एक दिवस नळाद्वारे पाणी मिळाले. सद्यस्थितीत उद्भव विहिरीला पाणी नसल्याने नळाला पाणी येत नाही. देवरगावसह अनेक गावांलगत असलेल्या वाड्यांचा पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्यात समावेश नसल्याने या गावांमधील कामांचे फेर आराखडे तयार करण्याचे निर्देश देऊनही हे आराखडे तयार झालेली नाहीत. अनक योजनांच्या उद्भव विहिरांना पाणी न लागल्याने या विहिरी फेल गेल्या आहेत. मात्र, येथे पाईप लाईन, टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. इतकेच नाही तर, याची बिले देखील ठेकेदारांना अदा केली असल्याचे खोसकर यांनी यावेळी निर्देशनास आणून दिले. मेटघर किल्ला येथील कामांबाबत तक्रारी आहेत. त्यावर कोणतीही उपाययोजना केली नाही.
तसेच ठराविक एक, दोन ठेकेदारांनी तालुक्यातील योजनांची कामे घेतली असून ती उपठेकदार नेमून त्यांच्या माध्यमातून करून घेतली जात आहेत. अनुभव नसणा-या ठेकेदारांना कामे मिळाल्याने ती अपूर्ण असल्याचा आरोप खोसकर यांनी यावेळी केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० कामे अद्यापही सुरू झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व पाणी पुरवठा योजनांची कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. श्रीमती मित्तल यांनी तक्रारी असलेल्या कामांची चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांसह अधिकारी तसेच तालुक्यांमधील सरपंच उपस्थित होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी आमदार खोसकर यांच्या तक्रारींची दखल घेऊन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांना दोन्ही तालुक्यांमधील योजनांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून दीपक पाटील यांनी या योजनांची पाहणी सुरू केली आहे.