Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : गोदाआरतीसाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या आरतीसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासनाने प्रस्ताव पाठवावेत, म्हणजे या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या गंगागोदावरी आरतीला लवकरच मुहुर्त लागणार असल्याचे दिसत आहे.

वाराणसीच्या धर्तीवर नाशिक येथे गोदाआरती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आराखडा सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला. गोदाआरतीचा मूळ आराखडा ५६ कोटी ४५ लाखांचा असून, त्यात अनेक बाबींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आराखडा राज्य शासनाकडे सुपुर्द केला आहे. त्यात दुरुस्ती करून फेरआढावा सादर करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. विशेष म्हणजे जलसंपदा विभाग व स्मार्ट सिटी यांचाही या आराखड्यात समावेश करण्याचे आदेश करण्यात आले. या आराखड्यास मंजुरी देण्यापूर्वी गोदाआरती सुरू होण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये तत्काळ मंजूर केले.

येत्या तीन दिवसांत हा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि आठ दिवसांची टेंडर प्रक्रिया राबवून ५ मार्चपूर्वी कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, सरोज अहिरे यांनीही सूचना मांडल्या.

दरम्यान गोदावरी नदीच्या सुशोभिकरणासाठी स्मार्ट सिटीला ३५ कोटी रुपये मंजूर झाले असून यातील ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी सांगितले. त्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार आक्षेप घेतला. रामतीर्थात कुठल्या स्वरुपाचे काम झाले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावरून आमदार फरांदे व सुमंत मोरे यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे बघायला मिळाले. अखेर मंत्री मुनगंटीवार यांनी मध्यस्थी करत आता स्मार्ट सिटीचा विषय बाजूला ठेवून नवीन आराखड्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

दहा कोटींच्या निधीतून होणारी कामे
- रामतीर्थावर घाट उभारणी
- लाईट्सची व्यवस्था
- साऊंड सिस्टिम
- एलईडी स्क्रीन
- भाविकांसाठी सुविधा