Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थामध्ये होणार 17 हजार कोटींची कामे; मंत्री महाजनांना आराखडा सादर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व जिल्हा प्रशासन अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी मिळून १७ हजार कोटी रुपयांचा आराखडार तयार करून सिंहस्थ जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. हा आराखडा राज्याच्या शिखर समितीकडे सादर करून तो मार्गी लावला जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यानी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होत असून त्यासाठी नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर व जिल्ह्यातील इतर भागातील विकासकामांचे आराखडे संबंधित विभागांनी तयार केले आहेत. नाशिक येथील महापालिका हद्दतील सिंहस्थ विकास कामांचा आराखडा नाशिक महापालिकेने तयार  केला आहे. नाशिक महापालिकेच्या सर्व विभागांनी मिळून जवळपास ११ हजार कोटींचा आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनेही सिंहस्थ आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनीही सहा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात जवळपास १७ हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी या आराखड्यांचे मंत्र्यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठंी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

नाशिक - त्र्यंबकेश्‍वर मार्ग होणार सहापदरी
नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा चौपदरी मार्ग सहापदरी करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. नव्याने दोन लेनमध्ये पालखी मार्गाचा विचार करून मार्गाची उभारण्यात येणार असून त्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

ठळक घडामोडी
- नाशिकमध्ये १६० किलोमीटरचे रिंगरोड प्रस्तावित
- नाशिक शहरात नवीन २१ पुल ऊभारण्यात येणार
- साधुग्रामसाठी ५०० एकर भूसपंदनाचा प्रस्ताव
- विल्होळी-सारुळ-त्र्यंबकरोड रिंगरोडचा प्रस्ताव
- सिंहस्थात शहरात मुख्य, मध्य व बाह्य वाहनतळ
- शहरातील घाट, दिशादर्शकांची पुर्नबांधणीची गरज
- गणेशवाडी अग्निशमन केंद्र प्रस्तावित