नाशिक (Nashik) : नाशिक-मुंबई महामार्गावर पुलांचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीए, पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबईत पोचण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. व्यावसायिक संघटना, तसेच सर्वसामान्य नागरिकांची या विषयावर नाराजी आहे. राजकीय पक्षांनी देखील आंदोलनाचे इशारे दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांच्याशी संवाद साधला. महामार्गावर काही ठिकाणी पुलांचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगताना दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अवजड वाहनांना प्रवासासाठी वेळेचे बंधन लावण्यासह खड्डेही तातडीने बुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होऊन रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
चारशेपार आकडा झाल्यास देशाची घटना बदलणार व आरक्षणदेखील नष्ट होईल, असे मतदारांपर्यंत पोचविल्याने विरोधकांना काही समाजाचे एकगठ्ठा मतदान झाले. परंतु आता विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून चुकीचे आरोप होत आहे. मात्र यात त्यांना यश येणार नाही. चांगल्या कामांमध्ये बाधा आणण्याचे काम विरोधक करत असल्याचा भुसे यांनी आरोप केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील उपोषणाला बसले आहेत. यावर बोलताना पालकमंत्री भुसे यांनी त्यांच्या भावना योग्य असल्याचे सांगितले. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून, ती पूर्ण केली आहे.