Nashik Ring Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : रिंग रोडसाठी 400 हेक्टरची गरज; 2600 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेले नाशिक (Nashik) औद्योगिक केंद्र आहे. याबरोबरच धार्मिक केंद्रही आहे. नाशिक शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी दिले.

प्रस्तावित परिक्रमा मार्ग हा ६५.४१ किलोमीटर लांबीचा असून रुंदी ६० मीटर एवढी आहे. त्यासाठी ४००.९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यासाठी अंदाजित २६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) प्रकल्पाची सद्य:स्थिती, सादरीकरण आणि आढावा बैठक मंत्री भुसे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

भुसे म्हणाले की, नाशिकच्या नागरिकरणात वेगाने वाढ होत आहे. मुंबई, पुणे मार्गाने होणारी वाहतूक शहरातून जात असल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत. नाशिक शहरातील वर्दळ, रस्ते, बाहेरून येणारी वाहतूक व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा होणारा परिणाम पाहता नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे. नाशिक शहरातून नाशिक-पुणे, नाशिक- वलसाड, मुंबई- नाशिक, नाशिक- मालेगाव हे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावरील सर्व प्रकारची आंतरराज्य वाहतूक तसेच राज्यांतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची वाहतूक शहराबाहेरून नाशिक परिक्रम मार्गाने (रिंग रोड) वा जलद निर्गमन मार्गाने वळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रस्तावित नाशिक परिक्रमा महामार्गासाठी विविध पर्याय आखणीचा सविस्तर अभ्यास करून इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार श्रेयस्कर पर्यायी आखणी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही प्रगती पथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी नाशिक विकास महानगर प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, वर्षा अहिरे- पवार, कार्यकारी अभियंता रंजना दळवी, महाव्यवस्थापक दत्तप्रसाद नडे, विलास कांबळे, कार्यकारी अभियंता प्रा. नि. नाईक, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एम. डी. शेख आदी उपस्थित होते.