Electronic Toll Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोलनाक्यावर सवलतीसाठी 31 ऑक्टोबरला बैठक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहन धारकांकडून चांदवड टोलनाक्यावर केली जात असलेल्या अवास्तव टोल आकारणीबाबत देवळा, कळवण, सटाणा या तालुक्यातील वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर पुन्हा ३१ ऑक्टोबरला बैठक होणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माजी आमदार संजय चव्हाण यांनी बागलाणमधील वाहन धारकांना चांदवड टोलनाक्यावर सवलत देण्याची मागणी केली, तर महामार्ग प्राधिकरणने टोलनाक्यापासून दोन-चार किलोमीटर परिसरापुरतीच सवलत देण्याची भूमिका घेतली. यामुळे तोडगा निघू शकला नाही. यामुळे ३१ ऑक्टोबरला पुन्हा बैठक होणशर असून त्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत व चांदवड या २५ किलोमीटरच्या अंतरात दोन टोलनाके असून त्या दोन्ही टोलनाक्यांवर मिळून एका बाजूने चारचाकीसाठी १६५ रुपये टोल आकारला जातो. कळवण, सटाणा व देवळा या भागात जात असलेल्या वाहन चालकांना  चांदवडच्या टोलनाक्यावरून महामार्ग सोडून जावे लागते, तरीही त्यांच्याकडून टोल आकारला जात असतो. या तालुक्यांतील वाहनधारकांकडून चांदवड टोलनाक्यावर होणारी अतिरिक्त करआकारणी रद्द करण्यासाठी माजी आमदार संजय चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, टोल व्यवस्थापन यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

चांदवड टोलनाक्यावर कळवण, देवळा बागलाणमधील वाहनधारकांची लूट सुरू असल्याने पिंपळगाव टोलनाक्याप्रमाणे चांदवडच्या टोलनाक्यावर या तालुक्यातील वाहनांची नोंदणी करून त्यांना सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने केली. चांदवड तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत  एमएच ४१ पासिंग म्हणजे चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा या तालुक्यतील वाहनांना सारखीच सवलत मिळावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या बैठकीत बागलाणमधील वाहनधारकांना सवलत दिल्याचा निर्णय दिल्याचे संजय चव्हाण यांच्याकडून सांगितले जात असले, तरी महामार्ग प्राधिकरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. चांदवड टोलनाका परिसरापासून दोन-तीन किलोमीटर परिघातील वाहनांना सवलत देण्याची तयारी राष्ट्री महामार्ग प्राधिकरणने दाखवली असून त्याबाबत तोडगा न निघाल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा ३१ ऑक्टोबरला बैठक होणार आहे.

असा आहे प्रश्न
बागलाण, देवळा, कळवण या तालुक्यांतील वाहनधारकांना मंगरुळ फाटा ते चांदवडपर्यंत महामार्गावरील अडीच किलोमीटरसाठी एका बाजूने १६५ रुपये तर परतीच्या प्रवासासाठी ३३० रुपये टोल लागतो. मालेगाव तालुक्यातील वाहनधारक या महामार्गावरून १०० किलोमीटरचा वापर करत असतानाही त्यांना चांदवड टोलनाक्यावर पूर्ण सवलत मिळते. या मुद्द्याकडे चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून सवलतीची मागणी केली आहे.