नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने देशातील रेल्वेमध्ये सुधारणा घडवून आणताना एकेरी मार्गांचे दुहेरी मार्गात रुपांतरण करणे व सर्व रेल्वेमार्गांचे इलेक्ट्रिफिकेशन करणे याला प्राधान्य देण्याच्या धोरणाचे स्पष्ट परिणाम समोर येऊ लागले आहेत. रेल्वे मंत्रालयाने २०८१ कोटी रुपयांच्या निधीतून मनमाड - दौड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरू असून आतापर्यंत ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे सध्या अनेक मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचा नगरपर्यंतचा प्रवासाचा वेग वाढला आहे. परिणामी अहमदनगरहून मनमाडला येणाऱ्या गाड्या सध्या ३० मिनिटे लवकर येत आहेत. यामुळे लवकरच मनमाड-दौड रेल्वेमार्गावरील सर्व गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाणार आहे.
ब्रिटिश काळापासून मनमाड ते दौंड रेल्वे प्रवासाची सुविधा असून या दरम्यान प्रवासासाठी यापूर्वी एकेरी मार्ग होता. पुढे या मार्गावर रेल्वे गाड्यांची वाहतूक वाढली. हा मार्ग दक्षिण भारताच्या प्रमुख रेल्वे मार्गांना जोडण्यासाठी महत्वाचा दुवा आहे. मात्र, त्यावरील रेल्वेवाहतुकीचा वेग धिमा असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाया जात होता. यामुळे या रेल्वेर्मााचे दुहेरीकरण करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. या अगोदर मनमाड - दौंड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. मध्यरेल्वे मार्गावरील सर्व मार्गांचे दुहेरीकरण होऊन इलेक्ट्रिफिकेशन झाल्यामुळे इंधनाची वर्षाला जवळपास ४०० कोटींची बचत झाली आहे. त्यातच मनमाड ते दौंड या रेल्वेमार्गाचेही इलेक्ट्रिफिकेशन झालेले आहे. मनमाड ते दौंड हा एकेरी मार्ग असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अत्यंत धिम्या गतीने होत असते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे प्रथम इलेक्ट्रिफिकेशन केल्यानंतर त्याचे दुहेरीकरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी २०८१ कोटी रुपये निधीची तरतूद केली.
त्या निधीतून मनमाड ते दौंड रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम ५६ टक्के पूर्ण झाले. तसेच २० टक्के काम पूर्णत्वाच्या जवळ आले आहे. आतापर्यंत १३४ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी १६२४ कोटी रुपये खर्च झाला आहे. यामुळे पुण्याहून अहमदनगरमार्गे मनमाडच्या रेल्वे प्रवासाला आता गती आली आहे. मनमाड-दौंड या संपूर्ण रेल्वेर्मााचे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाच्या वेळेत ४५ मिनिटांची कपात होणार आहे. पुण्याहून मनमाडला येणाऱ्या अनेक स रेल्वे सध्या अर्धा ते पाऊण तास वेळेअगोदर पोहोचत असल्याने मनमाडला त्या आऊटर साईडला उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे या सर्व रेल्वे मार्गावरील वेळापत्रक लवकरच बदलले जाणार आहे.