Malegaon Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon : आर्थिक शिस्त बसवण्यासाठी आयुक्तांनी दिली कामांना स्थगिती

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मालेगाव महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक घडी बसवण्यासाठी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी मंजूर झालेल्या मात्र, कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभागप्रमुखांना त्यांच्याकडील अशा कामांची यादी तीन दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच भूमिगत गटार व प्रस्तावित पाणी पुरवठायोजना या महत्वाच्या कामांना देखील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आधीच लटकलेल्या या कामांना आयुक्तांच्या निर्णयामुळे आणखी उशीर होणार असल्याचे दिसत आहे.

मालेगाव शहरातील महत्त्वाकांक्षी व मोठ्या प्रकल्पांचा हिस्सा, व्याज, वेतन, दरमहा खर्च वाढतच आहे. अशातच मालमत्ता, संकीर्णकर व नळपट्टी वसुलीच्या नावाने आनंदीआनंद आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी महापालिकेच्या निधीतील कामांना कार्यारंभ आदेश देऊनही अद्यापपर्यंत सुरू न झालेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निधीतील कार्यारंभ आदेश दिलेले तथापि आजतागायत काम सुरू न झालेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिल्याने संबंधित ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. आयुक्तांनी याबाबत सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्याकडील मंजुरी देण्यात आलेली, कार्यारंभ आदेश दिलेली मात्र काम सुरू न झालेल्या कामांची यादी ३ दिवसांच्या आत मागवली आहे. विभाग प्रमुखांनी प्रथमतः अशा प्रकारच्या कामापैकी आवश्यक कामे आयुक्त तथा प्रशासक यांची मान्यता घेऊनच सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका निधीच्या कामांना स्थगितीबरोबरच सर्वाधिक महत्त्वाकांक्षी व प्रस्तावित भूमिगत गटार व प्रस्तावित पाणी पुरवठायोजना या कामांना देखील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे हा निर्णय रोगापेक्षा उपाय जालीम व्हायला नको, असे बोलले जात आहे. भूयारी गटार व पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मोठ्या काळानंतर मंजुरी व निधी मिळाला आहे. मुळातच भुयारी गटार कामात अनंत अडथळे आल्याने एक वर्ष विलंब झाला आहे. पाणीपुरवठा चणकापूर ते जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी व भुयारी गटार ही दोन प्रमुख कामे होणे शहरहितासाठी आवश्यक आहे. यामुळे या कामांनाही दिलेली स्थगिती चर्चेचा विषय झाला आहे.