dada bhuse Tendernama
उत्तर महाराष्ट्र

पालकमंत्री भुसेंचे नाशिककरांना दहा हजार कोटींचे गिफ्ट, पाहा काय?

एमएसआरडीसी बनवणार रिंगरोड

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देऊन बढती मिळताच त्यांनी सिंहस्थापूर्वी नाशिक शहराबाहेरून प्रस्तावित करण्यात आलेला जवळपास दहा हजार कोटींचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

नाशिक शहराबाहेरून पाथर्डीफाटा ते आडगाव व आडगाव ते गरवारे पॉइंट हा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेकडून प्रस्ताव तयार केला जात असून, तो नगरविकास विभागाला सादर केला जाणार आहे. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकमध्ये २०२६- २७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी नियोजन नाशिक महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सुरू झाली आहे. त्यात प्रामुख्याने साधुग्रामसाठी जागा भूसंपादन, नाशिक शहराबाहेरून रिंगरोड,सिंहस्थ कुंभमेळा कॉरिडॉर, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गोदावरी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.  साधुग्रामसाठी यापूर्वी केलेले भूसंपादन व उर्वरित जागेबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गर्मेनी अहवाल मागविल्यानंतर सिंहस्थ नियोजनाला महापालिकेकडून सुरुवात झाली होती. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सिंहस्थ कामांविषयी प्राथमिक बैठक घेत सिंहस्थ कामांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ५६ किलोमीटर लांबीचा रिंगरोडचाही प्रस्ताव सादर केला होता. या मार्गांसाठी भूसंपादन करण्याइतपत महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने साधुग्रामसह रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने निधी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता. त्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

दरम्यान शासनाच्या नगररचना कार्यालयाने प्रस्तावित रिंगरोडचा नकाशा तयार केल्यानंतर महापालिकेनेही प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात ६० मीटर रुंदीच्या रिंगरोडसाठी १५८ हेक्टर, तर ३६ मीटर रुंदीच्या रिंगरोडसाठी १०९ हेक्टर अशी २६७ हेक्टर जागा संपादनाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आता शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या जागेच्या संपादनासाठी रोखीने मोबदला अदा करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे प्रोत्साहनपर टीडीआरच्या माध्यमातून मोबदला अदा करण्याची योजना आखण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर टीडीआर बाजारात आल्यास टीडीआरचा दर कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव तूर्तास बाजूला ठेवला आहे.

असा आहे ३६ मीटरचा रिंगरोड
आडगाव ट्रक टर्मिनससमोरून ३६ मीटर रिंगरोडची सुरुवात होईल. पुढे आडगाव, म्हसरुळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर - बारदान फाटा - गंगापूररोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा - सातपूर एमआयडीसीच्या पश्चिम हद्दी- त्र्यंबकरोड-  नंदिनी नदी ओलांडून अंबड एमआयडीसी- गरवारे रेस्ट हाउस- मुंबई- आग्रा महामार्ग

असा आहे ६० मीटरचा रिंगरोड
मुंबई-आग्रा  महामार्गा-खत प्रकल्प येथून- पाथर्डी  शिवार- पिंपळगाव खांब शिवार- वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवार- नाशिक-पुणे महामार्ग- पंचक- गोदावरी नदी- माडसांगवी शिवार -छत्रपती संभाजीनगररोड ओलांडून आडगाव शिवार-  ट्रक टर्मिनस- मुंबई-आग्रा महामार्ग