नाशिक (Nashik) : नाशिक मध्य मतदारसंघातील विकास कामांसाठी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांमध्ये ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून या निधीमधून प्रामुख्याने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नवीन वन भवन, भूमी अभिलेख विभागाचे नवीन कार्यालय बांधणे, संदर्भ सेवा रुग्णालयातील प्रलंबित कामे व महिला रुग्णालय ही कामे मार्गी लागणार आहे.
राज्य विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघासाठी विविध कामे सुचवली होती. त्यात ११५ कोटींच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे नवीन वसतिगृह बांधण्यासाठी ४३.५२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या वसतीगृहाचा नाशिक शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. नाशिक मतदारसंघातील वन विभागाच्या कार्यालयाची अवस्था बिकट असल्याने जुने कार्यालय पाडून त्याच जागेवर नवे वन भवन उभारण्यासाठीही या पुरवणी मागण्यांमधून २५ कोटी रुपये व सीबीएस येथे भूमी अभिलेख विभागाचे नवीन कार्यालय बांधण्यासाठी १४.९९ कोटी मंजूर करण्यात आले. संदर्भ सेवा रुग्णालयासाठी २० कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. भाभानगर येथील महिला रुग्णालयासाठी यापूर्वी मंजूर असणाऱ्या कामाला चार कोटींचा अतिरिक्त निधीही मंजूर झाला आहे.
बागलाणच्या आमदारांना सर्वाधिक ३११ कोटी
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील रस्त्यांसह इतर विकासकामांसाठी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांमधून ३११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात आदिवासी विकास विभागाने १७५ कोटी व सार्वजनिक बांधकाम विभागाने १०३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. भाजप आमदार दिलीप बोरसे यांनी यासाठी प्रयत्न केले. पुरवणी मागण्यांमध्ये बागलाण तालुक्यातील विकास कामांसाठी आदिवासी विकास विभागाकडून रस्ते विकासासाठी १७५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. तसेच रस्ते व पुलांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १०३ कोटी रुपये निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून मोसम नदीवरील सोमपूर ते तांदूळवाडी रस्त्यावरील पुलासाठी ९ कोटी रुपये, जायखेडा ते वाडी पिसोळ रस्त्यावरील मोसम नदीवर पूल बांधकामासाठी १० कोटी रुपये, राजपूरपांडे गावाजवळ मोसम नदीवर पूल बांधकामासाठी १० कोटी रुपये, सटाणा शहरातील चौगाव रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ कोटी रुपये, नामपूर गावातून जाणाऱ्या रस्त्यासाठी१ कोटी रुपये, नामपूर ते रातीर रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
आश्रमशाळांसाठी ३३ कोटी रुपये
बागलाण तालुक्यातील वीरगावपाडे, भिलवाड, तताणी, हरणबारी व वाघंबा या आश्रमशाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.