Nashik IT Park Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : राजकीय कुरघोडीमध्ये आयटी पार्कचे झाले खेळणे; जागा बदलाचा तीनदा खेळ

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राजकीय कूरघोडीमध्ये नाशिकच्या आयटीपार्कचे खेळणे झाले असून गेली दोन वर्षे केवळ आयटी पार्कचे ठिकाण कोणते असावे, याचा खेळ खेळण्यातच गेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये आयटी पार्कचा प्रवास कधी नाशिक महापालिका हद्दीत आडगाव शिवारात, कधी अक्राळे एमआयडीसी, असा होत होत अखेर नाशिकच्या आयटी पार्कला आता नाशिक तालुक्यातील राजूरबहुले एमआयडीसीत ५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. आता या जागेचे भूसंपादन कधी होणार व आयटीपार्क कधी उभारणार, यावर अनेक वर्षांपासून नाशिकलाही आयटी पार्क व्हावा, या स्वप्नाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने स्थानिक युवकांना पुणे, बंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये जावं लागते. यामुळे नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी नाशिकचे भाजपचे तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आडगाव शिवारात ३६५ एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची दहा एकर जागा आरक्षित करण्यात आली. त्यासाठी परिसरातील जागा मालकाकडून एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्टद्वारे प्रस्ताव मागवले होते. यात पन्नास टक्के जागा आयटी पार्कसाठी, वीस टक्के जागेवर निवासी क्षेत्र, पाच टक्के जागेत अॅमिनिटी तर पाच टक्के जागा व्यवसायासाठी असा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला काही जागा मालकांनी प्रतिसादही दिला होता.

त्यानंतर महापालिकेने मार्च २०२२ मध्ये आयटी परिषदही घेतली. या परिषदेत टीसीएस, सीन टेल, क्रेडिट सिस, इन्फोसिस, विप्रो, केपीआयटी आदी राष्ट्रीय स्तरांवरील १५ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे या आयटी परिषदेला सरकारी पातळीवरून काही मदत मिळणार नाही, यासाठीही प्रयत्न झाले, परिणामी या आयटीपार्कबाबत काहीही हालचाल झाली नाही.  पुढे राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर नाशिकला आलेल्या उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिकचा आयटी पार्कचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीमध्ये १०० एकर जागा आरक्षित ठेवण्याची घोषणा केली. यामुळे आडगाव शिवारातील आयटी पार्कचा विषय मागे पडून आयटी पार्क अक्राळेत होणार असल्याची नवीन चर्चा समोर आली. दरम्यान शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्याच पक्षाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून आयटी पार्कची जागा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार उद्योमंत्र्यांनी उद्योग विभागाची बैठक घेतली.

बैठकीत उद्योगमंत्र्यांनी खासदार गोडसे आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिक तालुक्यातील राजूर बहूला येथे आयटीसाठी दोन टप्प्यात शंभर एकच जागा आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आणि आयटी पार्कचा आडगाव शिवारातून सुरू झालेला प्रवास अखेर राजूर बहुला येथील एमआयडीसीमध्ये येऊन थांबला आहे. त्या बैठकीतील निर्णयानुसार उद्योग विभागाच्या अधिसूचिमध्ये राजुलबहुला येथे आयटीपार्कसाठी ५० एकर जागा आरक्षित करण्याचा समावेश करण्यात आला आहे.  राजूर बहुला येथे नियोजित औद्योगिक वसाहत असून त्यातील ५० एकर जागेवर आयटी पार्क उभारला जाणार आहे. यामुळे सुरुवातीला नाशिक महापालिका हद्दीलगत आडगाव शिवारात ३३० एकर जागेचा प्रस्ताव त्यानंतर स्वत: उद्योगमंत्र्यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीत आयटी पार्कसाठी १०० एकर जागा आरक्षित ठेवण्याची घोषणा या बाबी मागे पडल्या असून आता नाशिकचे आयटी पार्क राजूरबहुला येथेच होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या आरक्षित जागेचे लवकरात लवकर भूसंपादन होऊन तेथे पायाभूत सुविधा उभारण्यासाठीही प्रयत्न होतील की आयटी पार्कची जागा बदलण्याचा हा खेळ असाच सुरू राहणार, हे येथील राजकीय नेत्यांनाच माहीत.