Sports Complex Tendernama
उत्तर महाराष्ट्र

जळगावात 240 कोटींच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव; मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जळगाव जिल्ह्यातील मौ.मेहरुण येथील विभागीय क्रीडा संकुल हे अतिरिक्त क्रीडा संकुल म्हणून उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या २४० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली असून मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. 

मेहरुण येथील विभागीय क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भुसे बोलत होते. नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल असून मेहरुण येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल अतिरिक्त असल्याने क्रीडा संकुलासाठीच्या निर्धारित नियमानुसार ५० कोटींच्या निधी पेक्षा या क्रीडा संकुलाची आर्थिक तरतूद ही २४० कोटी रुपये आहे. त्यामुळे याचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे जाईल, त्यानंतर त्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली जाईल.

मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर या क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष कामास तातडीने सुरवात केली जाईल. धुळे, नंदुरबार, जळगाव या भागातील आदिवासी विद्यार्थी, खेळाडू यांच्यासाठी हे क्रीडासंकुल उपयुक्त ठरेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.