Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये  २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यांच्या शिखर समितीसह राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व नाशिक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समित्या जाहीर केल्या आहेत. या समित्यांची घोषणा करताना नगरविकास विभागाने नाशिकमधील ज्येष्ठमंत्री छगन भुजबळ यांचा शिखर समितीत समावेश केला असून पालकमंत्री दादा भुसे यांना जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्षपद दिले आहे. सिंहस्थासाठी येणाऱ्या हजारो साधुसंतांसह लाखो भाविक व पर्यटकांसाठी सोयी सुविधा, आरोग्य व्यवस्था, दळणवळण सुविधा उभारण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीचे नियोजन व अंमलबजावणी या  समित्यांकडे असणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नगरविकास विभागाकडून शिखर समितीची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये महापालिकेची भूमिका महत्त्वाची असते तर जिल्हा प्रशासनाकडून त्र्यंबकेश्वरमध्ये सुविधा पुरवल्या जातात. शासनाकडून सिंहस्थासाठी विशेष निधी प्राप्त होतो. शासनाचेच पूर्ण नियंत्रण कुंभमेळ्यावर असते. त्यामुळे साडेतीन वर्षे शिल्लक राहिल्याने कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी समिती गठित करण्याची मागणी होती.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सिंहस्थ समिती जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती व त्या समितीच्या सहाय्यासाठी इतर तीन समित्यांची घोषणा केली आहे. राज्यस्तरीय शिखर समितीत तब्बल ११ मंत्र्यांचा समावेश असेल. समितीचे उपाध्यक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री, उद्योगमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री, पाणीपुरवठा मंत्री आदींचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, मुख्यसचिव, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष, गृह विभागाचे अतिरिक्त सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, नगरविकास विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त, दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आदी सदस्य असणार आहेत.
 राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, नगरविकास, नियोजन, वित्त, पाणी पुरवठा, जलसंपदा, ऊर्जा, परिवहन या विभागांचे प्रधान सचिव, पोलीस महासंचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, नाशिक महापालिका आयुक्त, नाशिकचे जिल्हाधिकारी याचा समावेश असणार आहे.

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून पालकमंत्री दादा भुसे या समितीचे सहअध्यक्ष असणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यात सदस्य असणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन केली असून या समितीमध्ये महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व इतर सर्व विभागांचे जिल्हास्तरीय विभागप्रमुख सदस्य असणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळाकाळात दळणवळण, पाणीपुरवठा, साधू-महंत भाविकांना राहण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन हे काम समित्यांचे राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी व खर्चास मंजुरी देणे, नियोजन व आराखडा अंमलबजावणीचा आढावा घेणे व सर्व विभागांचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.