Mantralaya Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : जलजीवनची चुकीची कामे तपासणीसाठी मंत्रालयातून आले पथक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशनच्या काही कामांच्या बाबतीत गंभीर त्रुटी असूनही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने त्यांची दखल घेऊन त्यात वेळीच सुधारणा केल्या नाहीत. यामुळे अखेर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने या कामांची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवले. या पथकाने नुकतीच यातील काही कामांची तपासणी केली. हे पथक पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाला अहवाल सादर करणार असून पुढच्या टप्प्यात उर्वरित कामांची तपासणी करणार आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून कामे दर्जेदार करण्याबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर मंत्रालयस्तरावरून त्याची दखल घेऊन तपासणी पथक पाठवावे लागले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ कामे मंजूर केली असून त्यापैकी ३५ कामे वगळता इतर कामे सुरू आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य सरकारने टाटा कन्सलटिंग इंजिनिअर्स या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेकडून प्रत्येक कामाची चार टप्प्यांत तपासणी करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी या त्रयस्थ संस्थेचा अहवाल असल्याशिवाय देयक न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे त्रयस्थ संस्थेच्या तपासणी अहवालास महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या त्रयस्थ संस्थेने पाहणी केलेल्या ७९ कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचा आहेत. यामुळे या योजनांच्या कामांच्या त्रुटी ठेकेदारांकडून दुरुस्त करून घ्याव्यात असे सांगितले. मात्र, जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. या कामांमधील त्रुटीमध्ये प्रामुख्याने जलवाहिनीची खोली केवळ फूटभर असणे, जलकुंभचे बीम नियमाप्रमाणे न बांधणे, जलकुंभाची क्षमता कमी असणे, जलकुंभ दर्जा सुमार असणे, पाण्याच्या टाकीसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, विहिरींचा परीघ कमी करणे आदी तबाबींचा समावेश आहे. त्रयस्थ संस्थेने या आक्षेपांचा समावेश अहवालात समावेश करूनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेकेदाराकडून दूर करून घेतलेल्या नाहीत. अनेक महिन्यांपासून ही कामे अशीच दोषपूर्ण असल्याने त्रयस्थ संस्थेने राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे हा अहवाल सादर केला. तसेच त्यातील गंभीर त्रुटींची माहिती दिली. दरम्यान या आठड्यात मंत्रालयात राज्यातील जलजीवनच्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर या त्रुटीपूर्ण कामांची तपासणी करण्यासाठी पाहणी पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १३) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले.

या पथकाने या ७९ कामांपैकी काही मोजक्या कामांची पाहणी केली. त्यात त्रयस्थ संस्थेने घेतलेल्या आक्षेपानुसार पाहणी केली असता त्यांना तथ्य आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या त्रुटी दूर करून घ्याव्यात अशा सूचना या पथकाने दिल्या. तसेच उर्वरित कामांचीही तपासणी लवकरच केली जाणार असल्याचे समजते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून केल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत अनेक तक्रारी असूनही मनुष्य बळाची कमतरता व रिक्त जागा यामुळे प्रत्येक काम बघणे शक्य नसल्याचे सांगत असतात. मात्र, त्रयस्थ संस्थेने अहवाल देऊनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने त्याबाबत काही कार्यवाही केली नाही. यामुळे त्या कामांची पुढें काहीही प्रगती झाली नाही. यामुळे अखेर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात पाठवले. या पथकाने काही कामांची तपासणी करून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच संबंधित ठेकेदारांना तातडीने या कामावरील आक्षेप दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.