Pothole Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : द्वारका ते नाशिकरोड सात वर्षांत 18 कोटी खर्च करूनही रस्ता खड्ड्यात

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक पुणे महामार्गावरील द्वारका ते नाशिक रोड या सहा किलोमीटर रस्त्यासाठी गेल्या सात वर्षात १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे, तरीही या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोष निवारण कालावधी संपल्याचे कारण देत ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास नकार दिला व  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण (सार्वजनिक बांधकाम विभाग) कडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था कायम असून नाशिकरोडवरून नाशिकला येजा करणार्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी व रस्त्याच्या नुतणीकरणासाठी २३ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. हा निधी मंजूर होईपर्यंत नागरिकांना या नादुरुस्ती रस्त्याचाच वापर करावा लागणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक ते सिन्नर हा मार्ग सार्वजनिक बांधकामच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आहे. त्यातील नाशिक रोड ते द्वारका सर्कल हा सहा किलोमीटरचा भाग नाशिक महापालिका हद्दीत येतो. या मार्गावरील दत्त मंदिर चौक ते द्वारका सर्कल हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. यामुळे या मार्गाच्या शहरातील वाहतूक कोंडी अवलंबून असते. या सहा किलोमीटर रस्त्याचे २०१६ मध्ये मजबुतीकरण केले होते. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्याचा दोष निवारण कालावधी संपल्याने विभागाने  २०२० मध्ये पुन्हा १० कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे मजबुतीकरण केले. या रस्त्यासाठी दोष निवारण कालावधी तीन वर्षांचा होता. तो कालावधी नेमका यावर्षी जूनमध्ये संपला. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था मागील वर्षाच्या तुलनेने कमी होती. मात्र, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्डे वाढले आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर या विभागाने ठेकेदाराला खड्डे बुजवण्यास सांगितली. मात्र, दोष निवारण कालावधी संपल्याचे कारण देत ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास नकार दिला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे खड्ड्यांचा आकार वाढत चालल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे निधी नसल्याने तेही रस्त्याची दुरुस्ती करीत नाही.
नव्याने प्रस्ताव पाठवला

नागरिकांकडून दत्तमंदिर चौक ते द्वारका सर्कल रस्त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. यामुळे या विभागाने रस्ते दुरुस्ती व रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी दोन प्रस्ताव तयार करून ते केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला आहे. त्यात दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये व मजबुतीकरण करण्यासाठी २३ कोटी  रुपयांची मागणी करण्यात आली आहे, असे या विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान तोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजवले जातील, असेही सांगण्यात आले आहे.