Lift Irrigation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

जलसंधारण प्रकल्पांबाबत उत्साह संपला; वर्षानुवर्षे पाठपुरावा पण...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येवला (Yeola) तालुक्यातील महालखेडा येथील कोटा बंधारा ममदापुरचा मेळाचा बंधारा, देवना बंधारा त्याचबरोबर प्रस्तावित साठवण राजापूर (वडपाडी) व जायदरे (आडनदी) आदी प्रकल्पांसाठी 2004 पासून पाठपुरावा सुरू आहे. येवल्याचे आमदार व माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकल्पांसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून दरवेळी वेगवेगळी कारणे देत आहेत. यामुळे प्रकल्प मार्गी लागत नसल्याने येवल्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पांची आशा सोडली आहे. यामुळे येवल्याच्या राजकीय चर्चेतून हे प्रकल्प हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

आमदार छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातील प्रस्तावित व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी महालखेडा येथील कोटा बंधाऱ्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर पूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ममदापुर या बंधाऱ्यासाठी ६ कोटी ४५ लक्ष रुपये निधी प्राप्त असून वनविभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागपूर कार्यालयात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या फेज वनला महिनाभरात मंजुरी मिळून प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अशीच आश्वासने वर्षानुवर्षे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

देवना साठवण प्रकल्प 772 हेक्टर वन जमिनीवर साकारणार असून त्या जमिनीच्या बदल्यात गायरान जमिनी वन विभागाला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून प्रकल्पाच्या टेंडरला परवानगी देण्याबाबत छगन भुजबळ यांनी जलसंधारण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांकडून दरवेळी अशीच उत्तरे दिली जात असतात. प्रत्यक्षात पुढच्या बैठकीपर्यंत यात काहीही प्रगती झालेली नसते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राजापूर वडपाटी व साठवण तलाव जायदरे या प्रकल्पाना अद्याप पाणी उपलब्धता दाखलेही मिळालेले नाहीत, त्यामुळे पुढच्या गोष्टी कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.