नाशिक (Nashik) : उद्योगांना सातपूर व अंबड एमआयडीसीमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी अडीच हजार एकर जमीन संपादित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात सिन्नर तालुक्यातील मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबुटके, नाशिक तालुक्यातील राजूरबहुला, इगतपुरी तालुक्यातील आणि नांदगाव तालुक्यातील मनमाड औद्योगिक वसाहतींसाठी ९३८.४५ हेक्टर भूसंपादन प्रस्तावित करण्यात आले आहे.
नवीन उद्योगांविषयी सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. उपलब्ध प्रकल्प अधिक विस्तारित करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, शहरात नवीन उद्योगांना जागा शिल्लक नाही, त्यासाठी जिल्ह्यातील पाच ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, शेतकरीवर्गाशी चर्चा केली जात आहे. राजूरबहुला हे उद्योगांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे ३३७ हेक्टरवर औद्योगिक वसाहत विकसित करण्याचे नियोजन केले होते. अजूनही या वसाहतीत उद्योग येण्याचे प्रमाण सुरूच आहेत.
औद्योगिक वसाहतीच्या नव्याधोरणामुळे जिल्ह्यात मोठमोठ्या ग्रुपचे उद्योग येण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश उद्योगांकडून भूखंडासाठी एमआयडीसीकडे विचारणा केली जात असल्याची माहितीही समोर येत आहे. दिंडोरीतालहुक्यातील जांबुटके येथे आदिवासी औद्योगिक वसाहती उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील वर्षी घेतानाच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात या औद्योगिक वसाहतीसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात या औद्योगिक वसाहतीबाबत राज्यस्तरावरून काहीही हालचाल झाल्याचे दिसत नाही. दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून जांबुटके आदिवासी औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रक्रियेची हालचाल सुरू झाली आहे.
राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात
उद्योगांकडून जागेची वाढती मागणी लक्षात घेता, नव्या औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीकडून नियोजन सुरू आहे. त्यात सिन्नरच्या मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथे आणि मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राजूरबहुला परिसरात भूसंपादन केले जाणार आहे. मापारवाडी आणि जांबूटके येथे पहिल्या टप्प्यात भूसंपादन होऊ शकेल, तर राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात असेल.
या प्रमाणे होणार भसंपादन
- जांबूटके - ३१.५१ हेक्टर
- मापारवाडी -२३०.६७ हेक्टर
- राजूरबहुला -४४.४३ हेक्टर
- आडवण घोटी -२६२.९७ हेक्टर
- मनमाड- २६८.८७ हेक्टर
एकूण- ९३८.४५ हेक्टर