Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थातील गर्दी व्यवस्थापनासाठी घेणार इंडिया रेझिलियंट संस्थेची मदत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकमध्ये २०२७- २८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होत असून शाही पर्वणीकाळात आखाड्यांच्या साधुमहंतांबरोबरच देश-विदेशातील भाविकाची संख्या मोठी असते. या गर्दीचे तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी इंडिया रेझिलियंट या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासमोर पंढरपूरच्या आषाढी वारीतील गर्दी व्यवस्थापनाचे सादरीकरण केले. सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापनासाठी या संस्थेने महापालिकेसमो काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

सिंहस्थ कुंभेमळा केवळ चार वर्षांवर येऊन ठेपला असून त्यादृष्टीने विकास आराखड्यांचे काम महापालिका स्तरावर सुरू झाले आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणार्या कामांचे प्रारुप आराखडे सादर केले असून सिंहस्थ समन्वय समितीकडून प्राधान्यक्रमाने त्यातील कामांचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. सर्व विभागांनी मिळून जवळपास दहा हजार कोटींची कामे या आराखड्यांमध्ये नमूद केली आहेत.

मागील सिंहस्थात नाशिकमधील पर्वणीला पन्नास लाखांहुन अधिक भाविक आले होते. आगामी सिंहस्थात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन महत्वाचे असणार आहे. त्यामुळे महापालिका  प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळणे व गर्दी नियंत्रण या दोन मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासमोर इंडिया रेझिलियंट संस्थेने त्यासंदर्भात सादरीकरण केले. या संस्थेचे प्रतिनिधींनी आयुक्तांना सांगितले की, पंढरपूरला आषाढी यात्रेचे वाहतूक व गर्दीचे यशस्वी व्यवस्थापन संस्थेने केले आहे.

आषाढी यात्रेला पंधरा ते वीस लाख भाविकांची हजेरी असते. यावेळी वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही शाहीस्नानाच्या वेळी गर्दी व वाहतूक व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची माहिती संस्थेंच्या प्रतिनिधींनी दिली. इंडिया रेझिलियंट य‍ा संस्थेने महापालिकेसोबत यापूर्वीही काम केले असून मागील वर्षी मिर्ची चौकातील अपघातानंतर शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल दिला होता. त्यावर आता अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.