Dada Bhuse Tendernama
उत्तर महाराष्ट्र

भुसेंची विरोधकांवर कडी; पोलिस बंदोबस्तात 'या' प्रकल्पाचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील बोरी आंबेदरी धरणातून (Bori Ambedari Dam) सिंचनासाठी बंदिस्त पाइपलाइन करण्याच्या कामाला अखेर पोलिस (Police) बंदोबस्तात सुरवात झाली आहे. बोरी आंबेदरी या धरणाच्या लाभ क्षेत्रात असूनही प्रवाही पद्धतीने कालव्याच्या शेवटच्या भागात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जलसंपदा विभागाकडून या बंदिस्त जलवाहिनीसाठी २१ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. मात्र, या बंदिस्त जलवाहिनी कामाला धरणालगतच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला. ते बघून मालेगाव तालुक्यातील भुसे विरोधकांनीही त्यात उडी घेतली. पण अखेरीस भुसे यांनी विरोधकांवर मात केल्याने या बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू झाले आहे.

या आठवड्यात पोलिस बंदोबस्तात राजमाने दहिदी रस्त्यालगत बोरी आंबेदरी धरणातून बंदिस्त पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरवात झाली. यावेळी झोडगे, राजमाने, अस्ताने येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते. जलवाहिनी समर्थक व विरोधक, शेकडो शेतकरी जमल्यामुळे जलवाहिनी विरोधक आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट होऊन बाचाबाची झाली.

दरम्यान, बोरी आंबेदरी बंदिस्त जलवाहिनीच्या कामाचे २३ ऑक्टोबरला मोठ्या थाटात भूमिपूजन झाले होते. माळभाथा परिसरातील शेतकरी त्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, धरणापासून जवळ असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या भूमीगत जलवाहिनीच्या कामाला विरोध दर्शवला. यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील विरोधकांनी साथ दिली. यामुळे आंदोलनाला चांगलीच धार येऊन आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली. आंदोलन चिघळत गेल्यामुळे कामाला उशीर होत चालला होता.

यामुळे बंदिस्त जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी झोडगे व परिसरातील शेतकऱ्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने मध्यस्थी करीत काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित झाले. दरम्यान आश्‍वासनानंतरही काम सुरू न झाल्याने १२ डिसेंबरला या शेतकऱ्यांनीही झोडगे येथे सर्वपक्षीय आंदोलन करीत रस्ता रोको केला. काम सुरू होत नाही, तो पर्यंत मुंबई-आग्रा महामार्ग अडवून धरण्याचा निर्धार त्यांनी केला. या महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर बंद होती. आंदोलनकर्त्यांनी पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा आग्रह धरला. अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी मोबाइलवरून संवाद साधत आठ दिवसांमध्ये काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित झाले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे.

काम सुरू करताना प्रशासनाने कामाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काम सुरू होताना या बंदिस्त जलवाहिनीस विरोध असलेल्या शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी या कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना प्रशासनाने दांडगाई करून काम सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या बंदिस्त जलवाहिनीचे काम ५८ दिवसांनंतर सुरू झाल्यामुळे बंदिस्त जलवाहिनीच्या समर्थक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.