Dr. Bharati Pawar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : आरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा अल्टिमेटम; 15 जानेवारीला आरोग्यवर्धिनी केंद्रांचे उद्घाटन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी नाशिक महापापालिकेला प्राप्त झालेला ६५ कोटी रुपये निधी वेळेत खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरून नऊ दिवसांत ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा 'अल्टिमेटम' दिला. काम न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मक्तेदारांची बैठक घेऊन तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून १०६ आरोग्य उपकेंद्रे अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यासाठी ६५ कोयी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ एकच आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागील मेमध्ये महापालिकेत या आरोग्यवर्धिनी केंद्राचा आढावा घेतला. त्यावेळी अंबड येथे केवळ एकच आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांमध्येही सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांची संख्या तेवढीच राहिली आहे. तसेच हा निधी वेळेत खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने १०६ आरोग्य वर्धिनी केंद्रापैकी ९२ केंद्रांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून ३० उपकेद्रांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली आहे.

महापालिकेकडून या आरोग्यकेंद्रांबाबत टाळाटाळ चालल्याने निधी जाण्याची शक्यता निर्माण झाल्याची बातमी टेंडरनामाने प्रसिद्ध केल्यानंतर डॉ. भारती पवार यांनी महापालिकेकडून या कामाचा आढावा घेतला असून या कामांसाठीचा एक रुपयाही परत जाता कामा नये, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ९२ आरोग्य वर्धिनी केंद्रांचे अंदाजपत्रक तयार होऊन त्यातील ५९ कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत त्यापैकी ३१ डिसेंबरपर्यंत ३० आरोगय वर्धिनी केंद्रांचे काम पूर्ण होऊ शकणा आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी १५ जानेवारीस या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करणार असल्याच स्पष्ट केले. त्यानुसा महापालिका आयुक्तांनी बैठक घेत संबंधित अधिकारी यांना कोणत्याही परिस्थितीत ३० आरोग्य उपकेंद्र ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच १५ जानेवारीस यापैकी १० आरोग्य वर्धिनी केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

असे आहेत आरोग्य वर्धिनी केंद्र
महापालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रात १ एमबीबीएस डॉक्टर, १ स्टाफ नर्स, १ बहुउद्देशीय सेवक व १ सहाय्यक अशी नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी महापालिका इमारत व पायाभूत सुविधा पुरविणार आहे. इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च महापालिका स्वनिधीतून करेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १०६उपकेंद्रांची निर्मिती होणार आहे. आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा व गर्भाशय कर्करोग या आजारांवर उपचार केले जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षण व उपचारदेखील महत्त्वाचा भाग असेल, माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून होईल.