नाशिक (Nashik) : पंचायत राज व्यवस्थेत दिवसेंदिवस ग्रामपंचायतींचे (Grampanchayat) महत्व वाढत चालले आहे. ग्रामपंचायतींना वित्त आयोग, पेसा कायद्यान्वये थेट निधी (Funds) प्राप्त होत असतो. याशिवाय सरकारच्या इतर योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारावर संनियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक गटविकास अधिकारी (ABDO) हे ब वर्ग पदाची निर्मिती ग्रामविकास विभागाने केली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांकडे इतर जबाबदाऱ्या असल्याने ते ग्रामपंचायतींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे केवळ ग्रामपंचायतींसाठी निर्माण करण्यात आलेल्या या पदामुळे ग्रामपंचायतींंच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.
पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयांना सरकारने महत्व दिले असून ग्रामपंचायतींच्या अधिकारात वाढ करून वित्त आयोग व पेसा कायद्यान्वये ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो. ग्रामपंचायतींच्या कारभारावर थेट नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामविस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांची असते. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांवर पंचायत समितीच्या शिक्षण, आरोग्य, इमारत व दळणवळण, महिला बालविकास, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागांप्रमाणे ग्रामपंचायत हा एक विभाग असतो.
प्रत्येक तालुक्यात साधारणपणे शंभरावर ग्रामपंचायती असतात. या सर्व ग्रामपंचायतींच्या कारभाराचे संनियंत्रण करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे ग्रामपंचायती व ग्रामसेवक यांच्या कामकाजाविषयी सतत तक्रारी येत असतात. यामुळे ग्रामविकास विभागाने आता गट विकास अधिकारी हे पद अ वर्ग दर्जाचे केले असून, सध्याची गट ब दर्जाची सर्व गट विकास अधिकारी पदे वर्ग अ मध्ये रुपांतरित केली आहे.
तसेच या अ वर्गाच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी हे ब वर्ग पद निर्माण केले असून या सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांकडे मुख्यता ग्रामपंचायत विभाग देण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारावर थेट नियंत्रण ठेवणे सुलभ होऊन जबाबदारीही निश्चित होणार आहे. याशिवाय समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन या विभागांचीही जबाबदारी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यावर ग्रामपंचायतीची तपासणी करण्याची महत्वाची जबाबदारी असणोर असून, या शिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे, ग्रामपंचायतीच्या वॉर्ड सभा, मासिक सभा, ग्रामसभा नियमितपणे पार पाडणे, ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण करून घेणे, ग्रामपंचायतींना विहित नियमाप्रमाणे मागावसर्ग, महिला व बालविकास खर्च करून घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली आहे.
या शिवाय ग्रामपंचायतींचा अर्थसंकल्प तयार करणे, ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन व नियंत्रण करणे, पंचायत समिती स्तरावरील कायदेशीर बाबी हाताळणे ही कामे करायची आहे. याशिवाय समाजकल्याण, कृषी, पेसा, निर्मल भारत अभियान, पाणी शुद्धीकरण, ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, पंचायत राज अभियान, पशुसंवर्धन विभाग आदी जबाबदारी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.