Bypass Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अनेक वर्षे प्रलंबित सटाणा बायपाससाठी अखेर 135 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील सटाणा शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सटाणा बाह्यवळण रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की बायपाससाठी केंद्र सरकारने १३५कोटी रुपये मंजूर केले आहेत.

विंचूर प्रकाशा महामार्ग सटाणा शहरातून जातो. या महामार्गावरून  भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे सटण्यात सतत अपघात होत असतात. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर आंदोलन होऊन बाह्य वळण रस्त्याची मागणी होते. त्यावेळी तात्पुरते आश्वासन देऊन समजूत काढली जाते. पण पुढचा अपघात होईपर्यंत हा विषय मागे पडतो. यामुळे प्रत्येक निवडणुकीत सटण्याचा बायपास हा विषय प्रचाराचा प्रमुख मुद्दा असतो. यामुळे प्रत्येक निवडणुकीत या बाह्यवळण रस्त्याचे आश्वासन दिले जाते. अखेर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.

डॉ. भामरे म्हणाले, या बाह्यवळण रस्त्याचे काम काही प्रशासकीय, तांत्रिक, स्थानिक अशा अडचणीमुळे प्रलंबित होते. त्या सर्व अडचणी दूर करण्यात आता यश आलेले आहे. हा रस्ता सुरवातीस एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र सरकारच्या देखरेख खाली करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिलेल्या होत्या. परंतु पुन्हा हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी स्वतःकडे घेतलेले आहे. आता त्या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. शहराच्या पूर्वेकडून रस्ता घेण्यात आला असून त्याचा नकाशाही तयार झाला आहे. या कामाचा २०२३ -२४ या वर्षाच्या वार्षिक नियोजनामध्ये केंद्र शासनाने समावेश केला आहे. या रस्त्याची लांबी ५.५ किलोमीटर असून रस्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारला १३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. अनेक वर्षांपासून सटाणा शहर वासियांनी या रस्त्याची मागणी होती. ती मार्गी लागणार असल्याचे आता दृष्टिपथात आले आहे.