Jal Jeevan Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : ‘हर घर नल से जल’ मार्च २०२४ पर्यंत अशक्य; जलजीवनच्या कामांना मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी मार्च २०२४ ही अंतिम मुदत ठरवली होती. ही मुदत संपण्यास अवघे दीड महिने उरले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मार्च २०२४ पर्यंत ८२१ योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यस्तरावरील आढावा बैठकीत दिले आहे. यापूर्वी मार्च २०२४ पर्यंत एक हजार योजना पूर्ण करण्याच्या आपल्याच उद्दिष्टात नाशिक जिल्हा परिषदेने कपात केली असली, तरी  राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. दरम्यान राज्यातील एकाही जिल्हा परिषदेला मुदतीत योजना पूर्ण करता येत नसल्याचे बघून आता पाणी पुरवठा मंत्रालयाने सर्व जिल्हा परिषदांना सर्व योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ पाणी पुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. त्यातील या १२२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या, पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूर्णत: नवीन असलेल्या पाणी पुरवठा योजनांची संख्य ५४१ आहे. या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.  या कामांची तपासणी करण्यासाठी टाटा कंसल्टिंग इंजिनियर्स या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने आतापर्यंत १०३० योजनांची किमान पहिली तपासणी केली आहे. तसेच ७३७ योजनांची दोनदा तपासणी केली आहे. त्रयस्थ संस्थेकडून दुपारी तपासणी केलेल्या योजनांची कामे साधारणपणे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीच्या आधाराने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दीड महिन्यांमध्ये ८२१ योजना पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण पुरवठा विभागाने मंजूर केलेल्या १२२२ योजनांपैकी जानेवारी अखेरपर्यंत २०४ योजना पूर्ण झाल्या आहेत. यामुळे आता पुढील दीड महिन्यांमध्ये केवळ ६१७ योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले असून हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यानी सांगितले.
  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, या विभागाच्या सध्याच्या कामांच्या प्रगतीवरून सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण होणार असल्याचा केला जात आहे. त्यांच्या दाव्यानुसार मार्च २०२४ पर्यंत ८२१ योजना पूर्ण झाल्यानंतर जून पर्यंत २७६ व सप्टेंबर २०२४ पर्यंत उर्वरित १२५ योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. यामुळे केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत जलजीवनची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत सहा महिन्यांनी पुढे ढकलली आहे.