Mnerga Tendernam
उत्तर महाराष्ट्र

Nashik : रोजगार हमी मजुरांना दोन महिन्यांचे थकीत 8.83 कोटी रुपये मिळाले दिवाळीत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अकुशल मजुरांची मजुरी अखेर केंद्र सरकारने वितरिक केली आहे. यामुळे दिवाळीमध्ये जिल्ह्यातील मजुरांच्या बँक खात्यात आतापर्यंत थकित असलेली त्यांची ८.८३ कोटी रुपये जमा झाले आहे.  नाशिक जिल्ह्यातील रोजगार मजुरांचे ८.८३ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकले होते. यामुळे मजुरांना ऐनदिवाळीत उधार-उसणावर करून सण साजरा करण्याची वेळ आली होती. दरम्यान केंद्र सरकारने राज्यातील मजुरांचे २९१ कोटी रुपये वितरित केल्याने जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाने या सर्व मजुरांच्या खात्यात तातडीने सर्व रक्कम जमा केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्याद्वारे मजुरांना वर्षातील किमान १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. सध्या अकुशल मजुरांना २७३ रुपये मजुरी दिली जाते. प्रत्येक आठवड्याला मजुरांना मजुरी देण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल तयार केले असून त्यावर मजुरांच्या दैनंदिन हजेरीची नोंद केली जाते. मजुरांना मजुरी मिळण्यास उशीर झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करण्याचा शासनाचा नियम असल्यामुळे रोजगार हमी कामावरील मजुरांना वेळेवर मजुरी देण्यावर सर्व विभागांचा भर असतो. मात्र, मागील दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने या रोजगार हमीवरील मजुरांसाठी निधीच वितरित केला नव्हता. त्यामुळे या मजुरांची मजुरी थांबली होती. रोजगार हमी कायदा लागू झाल्यापासून पहिल्यांदाच सरकारने निधी वितरित केल नाही, म्हणून मजुरांची मजुरी थकली होती. दरम्यान मागील सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केले नसल्याने य योजनेविषयीचा विश्वास डळमळीत झाला आहे. याबाबत ओरड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराजसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर या आठवड्यात निधी वितरित झाला. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने या सर्व मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केल्याने दिवाळीमध्ये मजुरांना पैसे मिळू शकले.

कुशलचे ६ कोटी मिळाले
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कुशल कामे केली जातात. या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उवरित अकुशल कामांचा समावेश असतो. त्यातील कुशल कामाची रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडील कुशल कामांचे ८.७४ कोटी रुपये सहा महिन्यांपासून थकले होते. केंद्र सरकारने अकुशल मजुरांची रक्कम वितरित केल्यानंतर राज्य सरकारनेही १५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामांची कुशलची रक्कम वितरित केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने ६.१८ कोटी रुपये रक्कम संबंधित सेवा पुरवठादारांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित २.५६ कोटी रुपये निधी पुढच्या टप्प्यात वितरित केले जाणार आहेत.