नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने (NMC) पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या व ठेकेदारांना (Contractors) दिलेली रस्ते देखभाल दुरुस्तीची मुदत संपलेल्या शहरातील रस्त्यांच्या अस्तरीकरणासाठी ७२५ कोटी रुपये लागणार आहेत. आधीच दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या रस्त्यांची डागडुजी अद्याप संपली नसताना महापालिकेला पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या रस्त्यांसाठी ७२५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र पॅकेज मंजूर करणे किंवा सिंहस्थ कुंभमेळा येईपर्यंत थांबणे हाच महापालिकेसमोर पर्याय आहे.
यावर्षी पावसाळ्यात नाशिक शहरातील सर्व रस्ते उखडले होते. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर महापालिका आयुक्तांनी रस्ते देखभाल दुरुस्तीची मुदत असलेल्या ठेकेदारांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. त्यावेळी प्रतिसाद न देणाऱ्या १३ ठेकेदारांना नोटिसा देऊन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. यामुळे पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्ती सुरू होऊन अद्यापही ती सुरूच आहे.
दरम्यान पाच वर्षांपूर्वी कामे केलेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची मुदत संपली आहे. हे रस्तेही यंदाच्या पावसाळ्यात नादुरुस्त झाले असून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. यामुळे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या रस्त्यांची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले. त्यानुसार पाच वर्षांपुढील व देखभाल दुरुस्ती कालावधी संपलेले जवळपास ७२५ कोटींचे रस्तेही खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा या रस्त्याच्या कामासाठी तेवढेच म्हणजेच ७२५ कोटी किंबहुना त्यापेक्षा अधिक रक्कम लागू शकते, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या सर्वेक्षणातच उघड झाले आहे.
दरम्यान पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून रस्ते दुरुस्तीसाठी वर्षाच्या सुरुवातीला तरतूद केलेल्या जवळपास ४० कोटींचा निधीही खड्डे भरण्यातच गेला, तरीही अद्याप पूर्ण रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला आता सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने येणाऱ्या निधीची वाट पाहावी लागणार आहे. दुरुस्ती व अस्तरीकरणासाठी ६ विभागात ७२५ कोटींचा निधी लागणार असून राज्य शासनाकडे नाशिकसाठी पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.