Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिककरांची फसवणूक? स्मार्ट सिटीच खोदतेय २१ कोटींचा स्मार्ट रस्ता

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्टसिटी (Smart City) कंपनीकडून  तयार करण्यात आलेल्या 21 कोटींच्या 'स्मार्ट' रस्त्याची आता जलवाहिनी टाकण्यासाठी तोडफोड केली जात आहे. केवळ एक किमीसाठी 21 कोटी रुपये खर्च करूनही या स्मार्ट रस्त्याचीही इतर रस्त्यांप्रमाणे खोदकाम करून वाट लावणार असतील, तर त्याचे स्मार्टपण काय उरले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्मार्टसिटीअंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. अशोक स्तंभ ते त्रिंबक रोड असा चांगला रस्ता असताना व शहरात स्मार्ट पायलट रस्त्यासाठी अनेक महत्त्वाचे रस्ते असताना नेमका हाच रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून हाती घेण्यात आला. यामुळे या रस्त्याला सुरवातीपासून विरोध झाला. सुरुवातीला 17 कोटींचा आराखडा असताना प्रत्यक्षात 21 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्याने दंडात्मक कारवाई झाली, पण यथावकाश दंड माफ करण्यात आला. हा रस्ता स्मार्ट होणार म्हणजे काही तरी आगळे वेगळे असेल, अशी समजूत निर्माण केली गेली. प्रत्यक्षात आधीच्या रस्त्यापेक्षा सुमार रस्ता बनवला गेला. रस्त्याच्या दर्जापेक्षा सुशोभीकरणासारख्या इतर बाबींना महत्व दिले गेले. सिग्नलवर फ्री वे बंद करून किंवा अरुंद करून वाहनचालकांची गैरसोय निर्माण केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक उभारले, पण त्याचा वापर चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ म्हणून होत आहे.

यामुळे एवढा निधी खर्च करूनही त्यातून कोणालाही समाधान जाणवत नाही. तसेच या रस्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण अधिक असून तुलनेने रुंदी कमी आहे. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी फूटपाथ मोठमोठे आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास दुचाकीस्वार या फुटपाथवरून वाहने चालवतात. यामुळे ठिकठिकाणी फूटपाथ उखडले गेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी फूटपाथ खोदण्याचे काम सुरूच असते.

या रस्त्यावरून प्रवास करताना रोलर कोस्टरचा अनुभव नागरिक घेत आहे. इथपर्यंत वाईट प्रतिक्रिया नागरिकांच्या असताना आता जलवाहिनी टाकण्यासाठी तोडफोड केली जाणार आहे. मुळात स्मार्ट रस्ता तयार करताना विविध प्रकारच्या केबल सायकल ट्रॅक जलवाहिनीसाठी नियोजन केल्याचा दावा करण्यात आला होता. आता स्मार्ट रस्त्याची तोडफोड होणार असेल तर हा दावा फोल ठरला असून, यानिमित्ताने नाशिककरांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी फुटपाथ खोदला जाणार आहे. गावठाण पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद आहे, असा खुलासा स्मार्ट सिटी कंपनीकडून केला जात आहे.