Mukane Dam Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : दुष्काळ हटवणाऱ्या चार उपसा वळण योजना मार्गी लागण्याची आशा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत नाशिकमधील दोन प्रवाही वळण योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर आता जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नाशिक जिल्ह्यातील चार उपसा वळण योजना मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक येथे घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या वळण योजना मार्गी लागणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनीही सिन्नर येथे कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादात अजित पवार यांना साथ देण्याच्या भूमिकेचे समर्थन करताना सिन्नरची वळण योजना मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या चार उपसा वळण योजनांसाठी जवळपास ३० हजार कोटींचा खर्च येण्याचा प्राथमिक अंदाज असून या योजना पूर्ण झाल्यास नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा सिंचनाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

नाशिक जिल्हयातील नार-पार दमनगंगा आदी पश्चिमवाहिनी नद्यांचे १३५ टीएमसी पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी अडवून ते उपसा वळण योजनेद्वारे नाशिक व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी घेतला आहे. त्यानुसार पार- गोदावरी (कादवा), एकदरा- गोदावरी (वाघाड) व दमणगंगा- गारगाई- गोदावरी (देवनदी सिन्नर) व नार-पार-गिरणा या चार प्रस्तावित वळण योजनांचे  प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया जवळपास पाच वर्षांपासून सुरू झाली आहे. त्यातील एकदरा गोदावरी व नार-पार- गिरणा या दोन नदीजोड प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाले असून एकदरा-गोदावरी (वाघाड) या वळण योजनेच्या प्रकल्प अहवालाची अंतिम तपासणी सुरू असून दमणगंगा- वैतरणा- गोदावरी (देवनदी सिन्नर) या प्रकल्पाचा अहवाल जुलै अखेरीस जलसंपदा विभागाला प्राप्त होणार आहे.

या चार प्रकल्पांमधून साधारणपणे २८ टीएमसी पाणी गोदावरी, गिरणा या तुटीच्या खोऱ्यांमध्ये वळवले जाणार आहे. यासाठी उपसा योजनांच्या माध्यमातून ३०० ते ५०० मीटरपर्यंत पाणी पाईपलाईद्वारे उचलले जाणार आहे. याशिवाय जिल्ह्यात प्रस्तावित केलेल्या २४ प्रवाही वळण योजनांपैकी १४ योजना पूर्ण झाल्या असून त्यांच्या माध्यमातून एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी वळवण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळाने मागील आठवड्यात कळमुस्ते व चिमणपाडा या दोन योजनांना मंजुरी दिली असून उर्वरित योजनांनाही लवकरच मान्यता मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पांमधील पाणी अडवल्यास जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव या दुष्काळी तालुक्यांप्रमाणेच मराठवाड्यालाही अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.

मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर नाशिकला पहिल्यांदाचा आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत या वळण योजनांचा प्रामुख्याने उल्लेख करून यापूर्वी आपण राज्यातील सर्व वळण योजना मार्गी लावण्यासाठीराज्य सरकारने एक लाख कोटी रुपये कर्ज घ्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत मांडल्याची आठवण सांगितली. यामुळे नवीन सरकारकडून निवडणुकीपूर्वी या योजना मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

अशा आहेत चार उपसा वळण योजना
पार- गोदावरी (कादवा) : ३.५ टीएमसी
नारपार गिरणा : १२.५ टीएमसी
एकदरा- गोदावरी (वाघाड) : ५ टीएमसी
गारगाई- गोदावरी (देवनदी सिन्नर) : ७.५ टीएमसी