नाशिक (Nashik) : चेन्नई-सुरत या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकर्यांना शेतकऱ्यांना बागायती जमिनीसाठी केवळ १४ लाख रुपये मोबदला जाहीर केला आहे. यामुळे या भूसंपादनास शेतकऱ्यांचा विराध सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट मोबदला मिळाला, तर जमिनी देण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांनी विरोध दर्शवण्यासाठी दिंडोरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांमधून सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग ९० किलोमीटर जात असून त्यासाठी साधारणतः ९९८ हेक्टर जमीन संपादीत होणार आहे. दिंडोरी तालुक्यातील रामशेज गावातील भूसंपादन निवाडा जाहीर झाला आहे. त्या गावातील जमिनी भूसंपादनाबाबत संबंधित जमीन मालकांना भूसंपादन विभागाकडून नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यात द्राक्षबागा, विहीर बांधकामासह बागायती जमिनीस हेक्टरी ३५ लाख ५१ हजार ८८२ रुपये म्हणजे एकराला १४ लाख रुपये दर जाहीर केला आहे. तसेच हंगामी बागायत क्षेत्रास २६ लाख ६३ हजार ९१२ रुपये प्रति हेक्टर म्हणजे एकराला १० लाख ६० हजार रुपये व जिराईत क्षेत्रासाठी हेक्टरी १७ लाख ७५ हजार ९४१ रुपये म्हणजे एकरी साडेसात लाख रुपये दर जाहीर केला आहे.
रामशेज परिसरातील विविध कंपन्यांचे खरेदी केलेले जमिनीचे खरेदीखत बघता साधारणतः दोन ते तीन कोटी रुपये प्रति हेक्टर बाजार भाव असताना शासनाने ठरवून दिलेला मोबदला अत्यल्प आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या अत्यल्प मोबदल्यामळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. रामशेजसारख्या भागात जाहीर केलेल्या दरावरून इतर गावांमधील शेतकऱ्यांना अंदाज आला आहे. यामुळे या भूसंपादविरोधात एकजूट वाढू लागली आहे.
आमदारांचे मौन
सुरगाणा, दिंडोरी, पेठ, व सिन्नर या तालुक्यांतील जमीन सुरत-चेन्नई महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.. या तालुक्यांच्या आमदारांनी विधानसभेत या मुद्यावर ब्र शब्द काढलेला नाही. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट न केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांना हवे असलेले दर
बारमाही बागायती क्षेत्र : हेक्टरी ४ कोटी रुपये
हंगामी बागायती क्षेत्र : हेक्टरी ३ कोटी 50 लाख
जिरायती क्षेत्र : हेक्टरी ३ कोटी रुपये