Samruddhi Mahamarg Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सरकारकडून नुसतीच आश्वासने; अखेर शेतकऱ्यांनी रोखला समृद्धी महामार्ग

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी करताना प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासने दिली. प्रत्यक्षात महामार्ग पूर्ण होऊनही त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसून, समृद्धी लगत राहत असलेल्या शेतकऱ्यांना या महामार्गामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे.

समृद्धी लगतच्या ग्रामीण रस्त्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वहिवाटीचे रस्ते तयार करून न देणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग जवळपास १५ मिनिटे रोखून धरला. प्रशासनाने यात मध्यस्थी करीत २८ ऑगस्टला सिन्नर तहसील कार्यालयात समृद्धीबाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंत पूर्ण झाले असून या दरम्यान वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलन करून त्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. त्यात प्रामुख्याने ग्रामीण रस्ते दुरुस्ती करणे व समृद्धी लगतच्या शेतांमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व्हिस रोड न उभारणे यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ, मंत्री, तहसीलदारांना निवेदन देऊनही याबाबत दखल घेतली नाही. एवढेच नाही, तर समृद्धी महामार्गासाठी वापरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांनी दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे त्यांनी आंदोलनाताच पावित्रा घेतला आहे.  

दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या समस्या कितपत मार्गी लागतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आंदोलन शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार समृद्धीलगतच्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, समृद्धी लगतच्या शेतात जाण्यासाठी १० फूट रुंदीचे रस्ते तयार करावेत, महामार्गासाठी खोदलेल्या खदानींत १० पेक्षा अधिक स्थानिकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी, अपुऱ्या सर्व्हिस रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी, नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत १० वेळा आंदोलन करण्यात आले आहे.