Electric Broom Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : यांत्रिकी झाडूंनी पहिल्या दिवशी केली केवळ 12 किमी रस्त्यांवर झाडलोट

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेला जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यांत्रिकी झाडू मिळाले असून दोन दिवसांपूर्वी या झाडूंचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू झाला आहे. जवळपास महिनभर यांत्रिकी झाडूने प्रायोगिक तत्वावर रस्ते स्वचछ केले जाणार आहेत. दरम्यान या चार यांत्रिकी झाडूंनी पहिल्या रात्री केवळ १२ किलोमीटरची स्वच्छता केली आहे. सध्या हे यांत्रिकी झाडू प्रायोगिक तत्वावर वापरले जात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणरे असले, तरी एका दिवसात १६० किलोमीटरच्या तुलनेत १२ किलोमीटर हे अंतर फारच कमी असल्याने या झाडूंच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक महापालिका महासभेने २० ऑगस्ट २०२१ ला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सहा विभागात ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता. यात पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचाही समावेश आहे. या झाडू खरेदीसाठी एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले.  नाशिक शहरात २१५० किलोमीटर लांबीचे रस्ते असून या यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून शहरातील प्रतिदिन १६० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, याप्रमाणे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये निव्वळ झाडू खरेदीसाठी खर्च होणार आहेत. त्यानंतर यांत्रिकी झाडू पुरवठादार कंपनीकडे पुढील पाच वर्षे यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ आदींची जबाबदारी असणार आहे. यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला ५ लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च संबंधित पुरवठादारास देणार आहे. पुरवठादाराने नोव्हेंबरमध्ये हे चार यांत्रिकी झाडू महापालिकेला सुपूर्द केल्यानंतर महापालिकेने या यांत्रिकी झाडूंची परिवहन विभागाकडे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मगळवारी (दि.५) रात्रीपासून या झाडूंद्वारे रस्ते झाडण्याच्या कामास प्रारंभ केला आहे.

महापालिकेच्या ताफ्यात सध्या चार यांत्रिकी झाडू असून या झाडूंनी साडेतीन मीटर रुंदीचे प्रत्येकी ४० किलोमीटरचे रस्ते आठ तासांमध्ये झाडण्याची क्षमता आहे. यामुळे हे चार यांत्रिकी झाडू आठ तास चालवल्यास शहरातील १६० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करता येणार आहेत. या चार यांत्रिकी झाडूंचा प्रारंभ मंगळवारी (दि.५) रात्रीपासून करण्यात आला. या झाडूंनी पहिल्याच रात्री सुमारे १२ किलोमीटर मार्गाचीच स्वच्छता झाली आहे. सध्या या झाडूंचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जात असला, तरी  प्रत्येक यांत्रिकी झाडूने केवळ तीन किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता झाल्याने या झाडूंच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या यांत्रीकी झाडूचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू असून पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेने ठरवलेल्या रस्त्यांवर रोज रात्री दहा ते पहाटे ६ या वेळेत यांत्रीकी झाडू चालवले जाणशर आहेत. पहिल्या रात्री यातील एक वाहन एबीपी सर्कल पासून सुरू होऊन सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर, दुसरे वाहन एबीपी सर्कल, महात्मानगर, जेहा सर्कल, अशोक स्तंभ या भागात तर तिसरे वाहन पंचवटी भागातील शाहीमार्ग, तपोवन आदी भागात व चौथे वाहन नाशिकरोड भागातील नांदूरनाका ते  बिटकोपर्यंत चालवून रस्त्यांची स्वच्छता केली जाणार होती. प्रत्यक्षात या चारही वाहनांनी मिळून केवळ १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली आहे. नाशिक शहरातील सर्व विभागात आउट सोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते- झाडलोट होते. त्यासाठी तीन वर्षासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येतात. यांत्रिकी झाडूमुळे महापालिकेचा खर्च वाचणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या झाडूंच्या कार्यक्षमतेविषयी पहिल्याच दिवशी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.