Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करणार: फडणवीस यांची घोषणा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरा बदलण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना दिले आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शिखर समितीच्या मान्यतेसाठी सिंहस्थ आराखडा तातडीने सादर करावा, सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सिंहस्थातील कामांसाठी आर्थिक तरतूद करण्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून सिंहस्थ आराखड्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर असलेल्या शांततेला आता चालना मिळणार आहे.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसस्थानकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी सिंहस्थ आराखड्यातील कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणशे, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा या कुंभमेळ्याला भाविक व साधू महंतांची गर्दी वाढेल. त्यामुळे त्यांच्यासाठी सुविधा पुरवाव्या लागतील, त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे. समितीने सिंहस्थ कामांचा समग्र विचार करून प्रारूप आराखडासादर करावा. पुण्याच्या धर्तीवर नाशिकच्या बाह्य रिंगरोडचा विकासही या निमित्ताने केला जाईल. या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पालकमंत्री भुसे यांनी सिंहस्थ आराखडा लवकरात लवकर तयार केला, जाईल असे आश्वासन दिले.

महापालिकेचा ११ हजार कोटींचा आराखडा

नाशिक महापालिकेच्या सर्व ४२ विभागांनी मिळून हजार कोटींची सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्याला अद्याप जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली नाही. राज्य सरकारने जिल्हा व राज्यस्तरीय समित्यांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात या समित्यांचे कार्यालय म्हणजे सिंहस्थ कक्ष सुरू झालेला नाही. यामुळे महापालिकेने आराखडा तयार केला, तरी तो कोणाकडे सादर करायचा, असा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आता सिंहस्थ कक्ष सुरू होऊन त्या आराखड्याला मान्यता देण्याबाबत कार्यवाही होण्याची आशा निर्माण झाली आहे.