नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच १३३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. या पार्श्वूभीवर जिल्ह्यातील आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेऊन आणखी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीकडे एखाददुसरा अपवाद वगळता इतर कोणीही आमदार फिरकले नाहीत.
यामुळे ही बैठक पुढे ढकलत पुढच्या आठ-दहा दिवसांनंतर आढावा घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील रहिवाशांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींना किती आस्था आहे, याचे दर्शन यानिमित्ताने घडले.
नाशिक जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ६३ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील बहुतांश पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला असून सिंचनाच्या पाण्याला कात्री लावण्यात आली आहे. या हंगामात भर पावसाळ्यातही अनेक तालुक्यांमधील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता.
प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनची कामे जिल्ह्यात सुरू असली, तरी अद्याप केवळ २०४ योजना पूर्ण झाल्या असून त्यांतील अनके योजनांची जलचाचणी बाकी आहे. यामुळे जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांच्या भरवशावर न थांबता पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ऑगस्ट २०२४ पर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी १८ कोटींचा टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयानेही तो आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटपासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यात कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक फळपिकाखालील क्षेत्रांसाठी अनुक्रमे २१८ कोटी, ८८५ कोटी व २० कोटी असे २४८ कोटी रुपये निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
या पार्श्वूभमीवर प्रत्येक तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीनुसार तेथील आमदारांकडून आणखी सूचना व उपाययोजना समजून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठक बोलावली होती. यापूर्वी ही बैठक वेगवेगळ्या कारणांमुळे दोनवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता जिल्ह्यात टंचाईच्या झळा बसण्यास सुरू झाल्या असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच १३३ टँकरद्वारे ४३६ वाड्यावस्त्या व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे.
तालुकास्तरावरून आतापर्यंत ४९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, टँकरच्या २९० फेऱ्या केल्या जात आहेत. जूनपर्यंत टँकरची संख्या ५०० पर्यंत वाढण्याचा अंदाजा असून फेऱ्यांची संख्याही हजारच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यामुळे प्रत्येक तालुक्याच्या आमदारांकडून टंचाई आढावा बैठकीत याबाबत काही सूचना अपेक्षित असताना पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे जवळपास सर्वच आमदारांनी पाठ फिरवल्याने लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असूनही लोकप्रतिनिधींना या दुष्काळी परिस्थितीचे किती गांभीर्य आहे, हे यानिमित्ताने समोर आले.
पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घरकूल आढावा, महावितरण कंपनीबाबतच्या समस्या व टंचाई आढावा बैठक या तीन बैठका नियोजन केल्या होत्या. महावितरणच्या समस्येबाबत स्वतंत्र बैठक बोलावण्याबाबत आमदारांनीच मागील महिन्यातील जिल्हानियोजन समितीच्या बैठकीत आग्रह धरल्यामुळे आजची बैठक बोलावली होती. मात्र, त्यावेळी केवळ नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.
या बैठकीसाठी आग्रह धरलेल्यांपैकी एकही आमदार उपस्थित नसल्याने पालकमंत्र्यांनी ती बैठक रद्द केली. तसेच आमदारच उपस्थित नसल्याने त्यांनी टंचाई आढावा बैठकीही रद्द केली. त्यानंतर त्यांनी घरकूल आढावा बैठक सुरू केली. त्यावेळी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचे आगमन झाले.
दरम्यान आमदारांना इतर कामे असल्यामुळे ते आले नाहीत. तसेच काही आमदार विदेश दौऱ्यावर आहेत. यामुळे पुढच्या आठ-दहा दिवसांत टंचाई आढावा बैठक बोलावली जाईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.