नाशिक (Nashik) : महापालिकेच्या विविध कर विभागाने चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकातील विश्रामगृह, उपहारगृह व वॉटरपार्क यांचे मागील वर्षी केलेले लिलाव रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून महापालिकेन पुन्हा एकदा या स्मारकाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे.
नाशिक महापालिकेने २३ वर्षांपूर्वी पांडवलेण्याच्या पायथ्याशी चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक उभारले आहे. सुरवातीच्या काळात या स्मारकाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला परिणामी चांगले उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, महापालिकेने स्मारकाच्या एकेक विभागाचे खासगीकरण करण्यास सुरवात केली. त्यातून या प्रकल्पाच्या माध्यमातून येणारे उत्पन्न घटत केले. यामुळे महापालिकेचे खर्च वाढत गेला व उत्पन्न कमी कमी होत गेले. महापालिकेने या स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीवर आतापर्यंत जवळपास १३ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्या तुलनेत उत्पन्न अगदी कमी आहे. यामुळे फाळके स्मारक खासगीकणातून चालवण्यास देण्याबाबतचा पर्याय समोर येत असतो. त्यातूनच यापूर्वी खासगीकरणातून या प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दिवंगत सिनेदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमार्फत फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर टेंडर मागवण्यात आले होते. मात्र ते टेंडर रद्द करण्यात येऊन हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर स्मारकाच्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नव्या प्रस्तावालाही तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला. यामुळे खासगीकरणाचा प्रस्ताव मागे पडून महापालिकेच्या निधीमधून प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी सल्लागार नियुक्ती प्रक्रिया राबवली होती. पुढे तो प्रस्तावही मागे पडला.
त्यानंतर आता पुन्हा एकदा स्मारकाचा विकास खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअनुषंगाने विविध कर वसुली विभागाने स्थायी समिती समोर प्रस्ताव सादर केला असून, त्यात विश्रामगृह उपाहारगृह व वॉटर पार्कचे लिलाव रद्द करण्याची मान्यता मिळावी असे सूचित करण्यात आले आहे. बांधकाम विभागाने २० ऑगस्ट २०२३ ला दिलेल्या अभिप्रायानुसार लिलाव रद्द करण्यासाठी पुढील २५ वर्षांसाठी वॉटर पार्क व विश्रामगृह पीपीपी तत्त्वावर देण्याचे कारण दर्शविण्यात आले आहे. यावरून फाळके स्मारकाचे पुन्हा खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे दिसत आहे.