नाशिक (Nashik) : वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणामुळे सिटीलिंकचे कर्मचारी वारंवा संप करीत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (एनएमपीएमएल) बस वाहक पुरवण्यासाठी केवळ एकाच ठेकेदारावर अवलंबून राहण्याऐवजी आणखी एका ठेकेदाराची नियुक्तीसाठी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली आहे. त्यानुसार १५ जानेवारीपासून दुसर्या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याचे समजते. यामुळे सिटीलिंक सेवा अचानकपणे बंद होण्यातून शहर वासीयांची मुक्तता होणार आहे.
नाशिक महापालिकेने जुलै २०२१ मध्ये महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सिटीलिंक शहर बससेवा सुरू केली. या सेवेसाठी वाहक पुरवण्यासाठी दोन ठेकेदार नेमण्याचा निर्णय झाला होता. एका ठेकेदाराला ४०० वाहक पुरवण्याची मर्यादा असल्याने व सुरवातीला वाहकांची संख्या ४०० च्या आत असल्याने एकाच ठेकेदाराची नियुक्ती केली. दरम्यान शहर बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सिटीलिंकला आणखी वाचकांची गरज पडली. ती गरज भागवण्यासाठी सिटीलिंकने त्याच ठेकेदाराकडून आणखी वाहक मिळवले व एकाच ठेकेदाराकडून ५५० वाहक पुरवले जात आहेत. सिटीलिंक बससेवा पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. या दोन्ही डेपोतील वाहक एकाच कंपनीचे असल्याने आंदोलन झाल्यास संपूर्ण बससेवा ठप्प होते.
मागील नोव्हेंबरमध्ये दिवाळीत बोनस न दिल्याने वाहकांनी दिवाळीनंतर संप पुकारल्याने तीन दिवस बससेवा ठप्प होती. आतापर्यंत सहावेळी अचानकपणे बससेवा बंद करण्याचे आंदोलन झाले आहे. शहर बससेवा ठप्प झाल्याने सिटीलिंक कंपनी व महापालिका यांच्या प्रतिमेस धक्का बसतो. यातून तोडगा काढण्यासाठी सिटीलिंकने दुसरा ठेकेदार नेमण्याचा मागील डिसेंबरमध्ये निर्णय घेतला होता. त्यानुसार राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत नागपूर येथील युनिक कंपनी त्यास पात्रही ठरली. हा ठेका पुरवण्यासाठी या कंपनीकडून एक कोटी रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. या कंपनीने सुरवातील टाळाटाळ केली असली, तरी आता त्यांनी एक कोटी रपये अमानत रक्कम भरली आहे. यामुळे दुसऱ्या पुरवठादाराने नुकतेच कंपनीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, ही नवीन कंपनी १५ जानेवारीपासून वाहक पुरवण्यास सुरुवात करणार आहे. हा नवीन पुरवठादार नाशिकरोड बस डेपोतून सुटणाऱ्या सुमारे शंभर सिटी बससाठी १८० वाहक पुरवणार आहे, तर जुना पुरवठादारा तपोवन बस डेपोतून सुरू होणाऱ्या १५० सिटी बससाठी २३५ वाहक पुरवठा सुरूच ठेवणार आहे.
संपातून सुटका होण्याची अपेक्षा
सिटीलिंक बससेवेच्या वाहकांची संप पुकारल्यामुळे शहरातील सार्वजनिक बससेवा विस्कळित होत असते. सिटीलिंक बससेवा सुरू झाल्यापासून सात ते आठ वेळेस नाशिककरांना या संपाचा अनुभव आला. या वाहकांचे दोन महिन्यांचे पगार न मिळाल्याने व इतर मागण्यांसाठी २०२३ च्या अखेरीस सर्व ४५० कंडक्टर दोन दिवसांच्या संपावर गेले होते. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तिकीट विक्रीतून दररोज सरासरी ३० लाख रुपये कमावणाऱ्या सिटीलिंकला शहर बससेवा बंद झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यावर तोडगा म्हणून एका पुरवठादाराचे वाहक संपावर गेले, तरी नवीन पुरवठादाराकडील वाहकांमुळे किमान निम्मी बससेवा सुरू राहील, यासाठी दोन पुरवठादार नियुक्त केले असून त्यामुळे शहरवासीयांची विस्कळित बससेवेपासून सुटका होण्याची अपेक्षा आहे.