Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थ आढाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाची भाजपवर कुरघोडी?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने तातडीने सिंहस्थ आराखडे शिखर समितीकडे पाठवावेत, असे आश्वासन दिले असताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सिंहस्थ आढावा बैठक घेऊन भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर पालिकेने अनुक्रमे 11 हजार कोटी व 165 कोटींचे प्रारूप आराखडे सादर केले. मात्र, या आढावा बैठकीत केवळ मध्य प्रदेशातील उज्जैन व उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यांची सखोल माहिती घेऊन नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सुचनेपलिकडे काहीही घडले नाही. यामुळे या आढावा बैठकीतून काय साध्य केले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वरला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यामुळे राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा समित्यांची रचना मागील महिन्यात जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हा समितीचे अध्यक्षपद ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिले आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद पालकमंतत्र्याकडे असायचे. यामुळे शिंदे गटाचे पालकमंत्री मंत्री दादा भुसे यांना डावलल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया न दिलेल्या पालकमंत्री भुसे यांनी प्रत्यक्ष सिंहस्थ आढावा बैठक घेऊन आपला अधिकार दाखवून दिल्याचे मानले जात आहे. बैठकीत नाशिक महापालिकेने ११ हजार कोटींचा तर त्र्यंबक नगरपरिषदेच्यावतीने १६४ कोटींचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाची चांगली संधी उपलब्ध होणार असून वाराणसीच्या धर्तीवर शाश्वत विकास कामांवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी दिले. साधुग्राम, साधु-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, वीजव्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन, येणार्‍या भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवणे, पार्किंग व्यवस्था, शहर विकास आदींबाबत करण्यात येणार्‍या कामांसदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हयातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा, अशी मागणी करत सप्तश्रृंगी गड विकास, त्र्यंबकेश्वर विकास, टाकेद तीर्थ विकासाची कामे सुचवली. कुंभमेळयासंदर्भात नाशिककरांच्याही सूचनांचा समावेश करण्यासाठी ‘ॲप’ तयार करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरसाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीत मंत्री भुसे यांनी कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडेही निधीची मागणी करण्यात येणार असल्याने नाशिकच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

सिंहस्थनिमित्ताने प्रस्तावित करण्यात आलेली कामे

-साधुग्रामसाठी पंचवटीत ५०० एकर जागेचे भूसंपादन

-सिंहस्थानिमित्ताने नाशिकमध्ये ३५० किलोमीटरचे रस्ते बांधणार

- नाशिक शहर व जिल्ह्यात २१ नवे पुल बांधणार

- गोदावरीवर २ किलोमीटरचे घाट प्रस्तावित

- गोदावरीवरील जुन्या घाटांची दुरूस्ती करणार

- नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ९२४ दिशादर्शक फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार