नाशिक (Nashik) : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमच्या जागेवर नवीन जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. याठिकाणी २५ कोटी रुपये खर्चून जिल्हा क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. सध्याचे स्टेडियमचे निर्लेखन होऊन ते पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपवण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागने पाडकाम करण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जुने स्टेडियम तसेच असताना भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान जिल्हा क्रीडा संकूल बांधण्यासाठी स्टेडियम पाडण्याची गरज नसल्याचे क्रीडा विभागाचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्हा परिषदेची नाशिकच्या मध्यवस्तीत जागा असून तेथे क्रीडा विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम उभारलेले आहे. त्या स्टेडियमचे काम अनेक वर्षे रेंगाळले तसेच तेथे वाहनतळासाठी जागा नसल्याने ते काम पूर्ण होण्याच्या आतच स्टेडियमचा विषय मागे पडला. यामुळे जवळपास २५ वर्षांपासून हे स्टेडियम पडून आहे. या स्टेडियमच्या जागेवर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव क्रीडा विभागाने विभागाकडून सध्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या जागेवर नव्याने जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात येणार असून, त्यासाठी १९ सप्टेंबर २०२२ रोजी पाडकामाचे टेंडर काढण्यात आले.
मात्र, या टेंडरला कोणी प्रतिसाद दिलेला नाही. परंतु, त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या क्रीडा संकुलाच्या पाडकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १९ सप्टेंबर २०२२ रोजी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, टेंडर घेण्यासाठी कोणी येत नसल्याने या कामाला विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेची ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. आता जिल्हा क्रीडा संकूल बांधण्यासाठी नवीन समिती स्थापण करण्यात आली असून पालकमंत्री त्याचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कार्यकारी अध्यक्ष आहेत.
या सुविधा उभारणार
सिंथेटिक ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, कबड्डी, खोखो, हॉलिबॉल मैदान, जिल्हा क्रीडा विभागाचे प्रशासकीय कार्यालय व वाहन तळ.