नाशिक (Nashik) : एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशापासून निर्माण होणारी राख उचलण्यावरून स्थानिक व बाहेरचे असा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आणखी विकोपाला जाऊ नये म्हणून एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने राखेचा उपसा करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशापासून निर्माण होणाऱ्या राखेमुळे पर्यावरणाची हानी होत असते. या प्रकल्पामुळे परिसरातील शेती अनुत्पादक झाली आहे. यामुळे राखेची विल्हेवाट वेळेत व्हावी आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये. या कारणाने महानिर्मिती कंपनीकडून व्यावसायिकांना राख मोफत दिली जाते. व्यावसायिक ही राख वीटभट्टी चालक, बांधकाम व्यावसायिकांना विकत असतात. यामुळे राख उचलणे, राखेची विक्री करणे याची एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे. बळी तो कानपिळी या तत्वाने अनेक राजकीय नेते व त्यांचे बगलबच्चे यांनी राख उचलण्याच्या व्यवसायावर स्वताचे बस्तान बसवले आहे. यामुळे या व्यवसाय स्पर्धेला जणू टोळीयुद्धाचे स्वरुप आल्याची चर्चा आहे.
राखेचेही गुणवत्तेनुसार प्रकार असतात. त्यातच एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती क्षमता कमी केल्यामुळे चांगल्या राखेच्या मागणीपेक्षा उत्पादन कमी होऊ लागल्यामुळे त्या चांगल्या राखेसाठी वाद निर्माण होऊ लागले आहे. राख उचलण्यातून अनेकांनी आपले साम्राज्य उभे केले असून चांगल्या राखेसाठी त्यांच्यात आपापसात वाढलेल्या स्पर्धेतून गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व्यावसायिक बाहेरच्या ट्रकचालक, वीटभट्टी व्यावसायिकांना राख भरण्यास मनाई करीत असल्याचे प्रकार घडले. काही व्यावसायिकांकडून धमकवण्याचेही प्रकार घडले. यामुळे प्रकरांना वैतागून पळसे परिसरातील ट्रकचालक, वीट भट्टी व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या वादाची दखल एकलहरे वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाने घेतली आणि राख उचलण्यावर बंदी घातली आहे. राख साठवणूक होणाऱ्या एक ते चार बंधाऱ्यातील राख उपसा उचलण्यास मनाई आदेश काढले आहेत.
एकलहरे केंद्रातून राख उचलणे व तिची विक्री करणे या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीचाही शिरकाव झाला असल्यामुळे स्थानिक व बाहेरचे असा वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. राख उचलण्यासाठी काहीही रक्कम मोजावी लागत नसली, तरी त्या राखेपासून कोट्यवधीची कमाई होत असल्यामुळे राख उचलण्यावर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केला जात आहे. या सर्व प्रकारांना कंटाळून केंद्राच्या परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवून तक्रार केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.