Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 'या' महिन्यात मिळणार नमामि गोदाचा प्रकल्प अहवाल

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या निधीतून येथील सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठीचा 'नमामि गोदा' प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अलमंडस ग्लोबल लिमिटेड व नांगीया अँड कंपनी या सल्लागार संस्थेला काम देण्यात आले आहे.

महापालिकेला ऑगस्ट अखेर अहवाल प्राप्त होणार असून, त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. केंद्र सरकारने गंगा नदी प्रदुषण मुक्त करण्यासाठी 'नमामी गंगा' प्रकल्प राबवण्यात आला. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये 'नमामि गोदा' प्रकल्प राबवला जाणार आहे. गोदावरी व उपनद्यांच्या काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ व सुधारणा करणे, नदीमध्ये मिसळणारे मलजल अडवून मलनिस्सारण केंद्रांकडे वळवणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे, नदीघाटाचे सुशोभिकरण व संवर्धन, नुतनीकरण करणे, मलजल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे आदी महत्वाच्या कामांचा नमामी गोदा प्रकल्पात समावेश आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. नमामि गोदा प्रकल्पाची अंमलबजावणी करताना मलजल ऑडीट केले जाणार आहे. या अंतर्गत पाणीपुरवठा, मलजल, मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया होणारे मलजलाचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे. प्रकल्प अहवाल ऑगस्टअखेर अंतिम करून महापालिकेला सादर केला जाणार आहे. महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये होणार असून, तोपर्यंतचा कालावधी लक्षात घेता प्रकल्प वेळेत होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या नद्यांचे पुनरुज्जीवन गोदावरी या प्रमुख नदीसह वाघाडी (वरुणा), नंदिनी, वालदेवी, कपिला या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात आला आहे.