नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका हद्दीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी १५ ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिकेने २२ ठिकाणे निवडून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. दरम्यान गेल्याच महिन्यात केंद्राच्या पथकाकडून निवड केलेल्या जागांची पाहणी केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक तसेच सीएनजी वाहनाचे वापर वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. नागरिकही इलेक्ट्रिक, सीएनजी वाहने खरेदीला पसंती देत आहेत. मात्र, नाशिकमध्ये इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यावर त्यांच्या बॅटरीज चार्जिंगचा मोठा प्रश्न निर्माण आहे. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिक इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. शहरातील सर्व भागांमध्ये बॅटरी चार्जिंगची सुविधा उपलब्ध असल्यास निश्चितपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढू शकतो. यामुळे नाशिक शहरात मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, आरटीओ कॉलनी (बोधले नगर), नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, लेखा नगर मनपाची खुली जागा, सिडको (मनपा विभागीय कार्यालय), नाशिक पूर्व (प्रमोद महाजन उद्यान, गंगापूर रोड), कृषि नगर जॉगिंग ट्रॅक, महात्मा नगर क्रिकेट मैदान, विभागीय कार्यालय सातपूर, फाळके स्मारक, विभागीय कार्यालय पंचवटी, गणेश वाडी भाजी मार्केट, बिटको हॉस्पिटल (नाशिक रोड), रामसृष्टी उद्यान, डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कला मंदिर समोर, रामदास कॉलनी उद्यान, तपोवन बस डेपो समोर, तपोवन रोड, इच्छामणी मंगल कार्यालय जवळील मनपा ची खुली जागा (उपनगर), राजे संभाजी स्टेडीयम आदी ठिकाणी ही स्टेशने प्रस्तावित आहेत.
नाशिक शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सुमारे १०६ ठिकाणे शोधण्यात आलेली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर त्यौपकी पंधरा ठिकाणी स्टेशन उभारणीचा प्रस्ताव आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नगरविकासच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन नाशिक शहरात युएनडीपी अंतर्गत स्टेशन उभारण्यास सांगितले आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिकेने २२ ठिकाणे निश्चित करून त्यातून पंधरा ठिकाणी स्टेशन उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त रमेश पवार यांनीही इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी नागरिकांना अगदी घराजवळ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार नवीन सदनिकाचे बांधकाम करताना २५ पेक्षा जास्त सदनिका असल्याच एक चार्जिंग स्टेशन व ५१ पेक्षा अधिक सदनिका असल्यास दोन जार्जिंग स्टेशन्स अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची बदली झाल्यावर हा निर्णय बाजूला पडल्याचे दिसत आहे.
केंद्राकडे दोनदा प्रस्ताव
नाशिक महापालिकेने एकूण २२ ठिकाणे निश्चित करून तसा प्रस्ताव शासनाकडे दोनदा पाठविला आहे. ज्या जागा निवडल्या आहेत. त्या जागांची पाहणी मागील महिन्यात केंद्र शासनाच्या पथकाने शहरात येऊन केली. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचे बोलले जात असले.