नाशिक (Nashik) : गोदावरी नदीच्या रामकुंड ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाले होते. मात्र, पुरोहित संघाने विरोध केल्यामुळे ते काम थांबले असताना संबंधित घटकांशी चर्चा करण्यासाठी निरीच्या पथकाने नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी याचिकाकर्ते तसेच पुरोहित संघ यांच्याशी चर्चा करून भूमिका समजून घेतली आहे. याबाबत लवकरच निरीला अहवाल सादर करणार असल्याची माहिती निरीचे अधिकारी पारस सुराणा यांनी दिली. दरम्यान गोदापात्रातील काँक्रिट काढण्यासाठी याचिकाकर्ते नदी संवर्धन समितीचे देवांग जानी व पुरोहित संघातील मतभेद अधिकाऱ्यांसमोरच चव्हाट्यावर आल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. येथील रामकुंडावर शाही पर्वणीला आखाड्याचे साधू, महंत भाविक शाहीस्नान करीत असतात. याठिकाणी गोदा पात्र खोल असून गोदावरी वाहती असताना तेथे पाण्याची खोली अधिक असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथम रामकुंड परिसरात काँक्रीट टाकण्यात आले. पुढे प्रत्येक सिंहस्थात गोदावरीत काँक्रिट ओतले गेले. परिणामी गोदावरी चा संपूर्ण तळ सिमेंटने झाकला असून गोदापत्रातील सर्व प्राचीन कुंड बुजले गेले आहे. यामुळे गोदावरीत नैसर्गिक पद्धतीने येणारे पाणी बंद झाले असून वरच्या भागात नदीपात्रात सोडलेल्या नाल्यांचे पाणी थेट रामकुंडात येत आहे. यामुळे गोदावरी प्रदूषित होऊन मृतवत झाली आहे. यामुळे गोदावरी संवर्धन समितीचे देवांग जानी यांनी गोदावरीच्या तळातील काँक्रीट काढण्यासाठी प्रयत्न केले असून उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले आहे. त्यानुसार जानी यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अमलबाजावणी महापालिकेच्या माध्यमातून करून घेत आहेत.
सध्या महापालिकेने काही ठिकाणी काँक्रिट काढून कुंड मोकळे केले आहेत. दरम्यान रामकुंड येथील काँक्रिट काढण्यास पुरोहित संघाने विरोध केला आहे. यामुळे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांसह तीन जणांची समिती गठण केली असून, त्या समितीच्या शिफारशीनुसार मंगळवारी (ता. ३) निरीच्या पथकाने रामकुंड परिसरात पाहणी केली. यावेळी गोदावरीतील जलस्रोत पुनरुज्जीवित होण्यासाठी कुंडातील तळ कॉक्रिट काढण्याची मागणी जानी यांची आहे. या वेळी निरीचे कुमार अमृत, स्मार्टसिटीचे सीईओ सुमंत मोरे, डॉ. प्राजक्ता बस्ते या अधिकाऱ्यांसह देवांग जानी, निशिकांत पगारे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, कल्पना पांडे आदी उपस्थित होते.
नदीपात्रातील प्राचीन जलस्त्रोताबाबत निरी पथकाने संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. जानी यांनी १७ प्राचीन कुंडांची माहिती दिली. दक्षिण गंगा झालेले ठिकाण, अस्थीवलय कुंड, धनुष्य कुंड याबाबतही अधिकाऱ्यांना नकाशासह माहिती दिली. प्राचीन सतरा कुंडांचा उल्लेख शासनाच्या गॅझेटमध्येही असल्याचे निदर्शनास आणून दिले. तळ कॉक्रिट १९५५-५६ ला प्रथम टाकण्यात आल्याचा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल त्यांनी केला. ही समितो निरीला अहवाल सादर करणार असून त्यानंतर गोदावरीच्या तळाचे काँक्रिट काढण्याबाबतची दिशा स्पष्ट होणार आहे.