नाशिक (Nashik) : दिवसागणिक वाढता तोटा लपवण्यासाठी महापालिकेच्या परिवहन महामंडळाने सिटी लिंक या बससेवेच्या प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक महानगर प्राधिकरणने सात टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) सादर केला असून तो मंजूर झाल्यास शहरातील प्रवाशांना जानेवारी २०२३ पासून सात टक्के भाडेवाढीचा भूर्दंड सोसावा लागणार आहे.
राज्य परिवहन विभागाची शहर बससेवा कोरोना काळात बंद झाल्यानंतर मागीलवर्षी ८ जुलैपासून महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक शहर बससेवा सुरू झाली आहे. महापालिकेला ही बससेवा तोट्यात चालवावी लागत असून पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत या बससेवेला जवळपास २७ कोटी रुपयांचा तोटा होईल, असा अंदाज तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला होता. या बससेवेचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकने ग्रामीण भागातही बससेवा सुरू केली आहे. मात्र, बससेवाचा तोटा कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे तोटा कमी करण्यासाठी महानगर परिवहन महामंडळाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सिटीलिंकच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करण्याची पूर्वपरवानगी आहे. यावर्षीच्या जानेवारीमध्ये पाच टक्के दरवाढ करण्यात आली होती. आता वर्षभरानंतर पुन्हा पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटीलिंकला आता तोटा होण्यास इंधन दरवाढीचे कारण दिले जात असून यावर्षी पाच टक्क्यांऐवजी सात टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या सात टक्के दरवाढीस महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. दरम्यान या दरवाढीस जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन समितीचीही मंजुरी आवश्यक आहे. यामुळे हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन समितीस सादर केला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर ही दरवाढ जानेवारीपासून लागू होणार आहे. दरम्यान नाशिक शहरात सिटीलिंकच्या २३० बसेस असून, त्यातील १८५ बसेस सीएनजीवर धावतात. उर्वरित बस डिझेलवर चालतात. तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्याबरोबरच इतर उपाययोजनांचाही शोध सिटीलिंककडून सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक बसवर जाहिरात लावण्यात येणार आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी बोलणी सुरू आहे.
पासचे दरही वाढणार
सिटीलिंकचे दरवाढीस मंजुरी मिळाल्यानंतर नियमित तिकिटांप्रमाणेच मासिक पासच्या दरातही वाढ होणार आहे. तसेच सुट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी तिकीटाचे दर पूर्णांकात करण्यात येणार आहेत.