नाशिक (Nashik) : नाशिक येथील ओझर विमानतळ (Ozar Airport) सुरू झाल्यानंतर येथील विमानसेवा कायम विस्कळीत राहिली आहे. (Nashik Airport)
केंद्र सरकारच्या उडाण (UDAN) योजनेनंतर येथून देशातील काही शहरांमध्ये विमानसेवा सुरू झाल्या. मात्र, उडाण योजनेची मुदत संपल्यानंतर पुन्हा विमानसेवा विस्कळित झाली. 'इंडिगो' व 'स्पाइसजेट' अशा दोन कंपन्यां येथून सेवा देत असल्या तरी सध्या केवळ 'इंडिगो'चीच सेवा सुरू आहे. यानंतरही ओझर विमानतळावरून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. ओझर विमानतळवरून मागील सहा महिन्यांत ९० हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.
नाशिक येथून मुंबईला विमानसेवा सुरू होण्याची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी विमानतळाचा प्रश्न होता. अखेर एचएएलच्या विमानतळावरून नागरी विमान उड्डाणास परवानगी मिळाल्यानंतर नाशिकहून देशभरात विमानसेवा उपलब्ध झाली आहे. सध्या 'इंडिगो'च्या दोन फ्लाइट्स नागपूर, गोवा, हैदराबाद, इंदूर या शहरांसाठी विमानसेवा देत असून, त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
जानेवारी व फेब्रुवारीत ओझर विमानतळावरून केवळ नवी दिल्ली व हैदराबाद अशा दोन शहरांसाठीच सेवा सुरू होती. यानंतरही या काळात अनुक्रमे १३,६२६ व १२,२७३ जणांनी विमानसेवेचा लाभ घेतला.
'इंडिगो'ने ओझर विमानळावरून १५ मार्चपासून सेवा सुरू केली. मार्चमध्ये १४,०२४ प्रवाशांची ये-जा झाली. एप्रिलमध्ये नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, गोवा व बेंगळूरला जाण्यासाठी रोज नाशिक विमानतळावरून सेवा उपलब्ध होती.
यामुळे एप्रिलमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन ती १५,३११ झाली. मेमध्ये १४,२१८, जूनमध्ये २०,५९९ नागरिकांनी ओझर विमानतळावरून प्रवास केला. ओझर येथून जूनमध्ये २०,५९९ जणांनी विमानप्रवास केला. नाशिकपासून शंभर किलोमीटरवर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, त्याचा फटका ओझर विमानसेवेला बसत असतो.
ओझर येथील विमानसेवा विस्कळीत असूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात या विमानसेवेत सातत्य ठेवल्यास येथून आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे मागील सहा महिन्यांच्या प्रवाशी संख्येवरून दिसत आहे.
प्रवाशी संख्या...
महिना प्रवाशी
जानेवारी १३,६२६
फेब्रुवारी १२, २७३
मार्च १४,०२४
एप्रिल १५,३११
मे १४,२१८
जून २०,५९९
एकूण ९०,०५१