नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा चार वर्षांवर येऊन ठेपला असून महापालिकेने सिंहस्थपूर्व कामांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख ११९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्याचे ठरले आहे. त्यासाठी ६२५ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे.
एकदा डांबरी रस्ता तयार केल्यानंतर तीन वर्षांनी त्यावर रिसर्फेस करणे आवश्यक असते. मात्र, हा खर्च दिवसागणिक वाढत असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरात जवळपास अडीच हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. शहराचा विस्तार वाढत असताना नवीन नगराची निर्मिती होत आहे. या नगरामध्येदेखील रस्त्यांची आवश्यकता आहे. नवीन रस्ते तयार करताना जुन्या रस्त्यांच्या देखभालीचाही खर्च वाढतो. महापालिकेच्या उत्पन्न मर्यादित असल्याने वाढत्या खर्चाचा भार महापालिकेला परवडत नाही.
महापालिकेचा महसुली खर्च ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आला आहे. भांडवली खर्चामध्ये सर्वाधिक खर्च बांधकाम विभागाकडे वर्ग होतो. त्यातही रस्त्यांवर होणाऱ्या खर्चात रस्ते दुरुस्तीवर अधिक भर आहे. मागील चार वर्षात महापालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर बाराशे कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. याच रकमेतून ठराविक रस्त्यांची निवड करून ते रस्ते कॉक्रिटीकरण केले असते तर रस्त्यांचे वयोमान तीस वर्षांपर्यंत पोचले असते व रस्ते दुरुस्तीचा त्रास वाचला असता. त्यामुळे रस्त्यांवरील वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाकडून रस्ते काँक्रिटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शहरातील डीपी रोड व्हाइट टॉपिंग काँक्रिट करण्याचे नियोजन आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ११९ किलोमीटरचे रस्ते केले जाणार असून, त्यासाठी ६२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता निधी नसल्याने शासनाकडे ६२५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.