Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : द्वारका-दत्तमंदिर रस्ता दुरुस्तीवर आठ वर्षांत 37 कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका चौक ते नाशिक रोड या सहा किलोमीटर रस्त्यासाठी गेल्या सात वर्षात १८ कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. या जूनमध्ये या रस्त्याचा दोष निवारण कालावधी संपल्याचे कारण देत ठेकेदाराने पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणने (सार्वजनिक बांधकाम विभाग) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे रस्ते दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने या दुरुस्तीसाठी १९.४२कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान दर तीन वर्षांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असून रस्त्याची स्थिती जैसे थे असते. यामुळे या दुरूस्तीनंतर तरी या रस्त्याचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर द्वारका चौक ते दत्तमंदिर या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्याने आणि अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने नागरिकांची तसेच प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. द्वारका ते दत्तमंदिर हा सहा पदरी रस्ता असूनही दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण झालेले नसल्याने रस्त्याचा पुरेसा वापर होत नाही. परिणामी या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे शहरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच रस्त्यांवर खड्डे अनेक ठिकाणी उखडलेला रस्ता त्यात वाहतुकीची सतत होणारी कोंडी यामुळे प्रवासी त्रस्त झालेले आहेत. यामुळे  महामार्ग विकास प्राधिकरणने रस्ता दुरुस्तीसाठी पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून यापूर्वी २०१६ मध्ये ८ कोटी रुपये रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर केले होते. तो रस्ता तीन वर्षांत नादुरुस्त झाल्यानंतर पुन्हा २०२० मध्ये १० कोटी रुपये रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर केले. मात्र, पुन्हा तीन वर्षांनी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने आता १९.४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे या रस्त्यावर केंद्र सरकार ८ वर्षांत ३८ कोटी रुपये खर्च होणार आहे. खासदार गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तमंदिर ते द्वारका चौक या दरम्यानच्या महामार्गाचे मजबुतीकरण, अस्तरिकरण कामास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कामाला प्रारंभ होणार आहे.