नाशिक (Nashik) : येथे २०२७मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने भूसपंदानाच्या खर्चासह जवळपास १७ हजार कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. मागील म्हणजे २०२५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तुलनेत हा आराखडा जवळपास सात पटीने अधिक आहे. यामुळे राज्यस्तरावरून एवढा मोठा निधी मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्षाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या आराखड्यातील प्रत्येक कामाची व्यवहार्यता तपासून त्या पद्धतीने सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिकेा दिले आहेत. त्यामुळे या आराखडयाला मोठ्याप्रमाणाव कात्री लागणार असल्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आराखड्यातील कामांच्या व्यवहार्यतेसह नवीन आराखडा आठवडाभरात सादर केला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. प्रत्येक बारा वर्षांनी होत असलेल्या या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अनेक पायाभूत सुविधा उभारल्या जातात. त्यामुळे सिंहस्थ म्हणजे नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या विकासाची पर्वणी असते. मागील सिंहस्थात नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचा मिळून २३०० कोटी रुपयांचा विकास आराखडा होता. त्यातून रिंगरोड, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण, गोदावरीनदीवर पूल व इतर अनेक मार्ग उभारण्यात आले होते. त्यामुळे आगामी सिंहस्थाच्या निमित्तानेही अधिकाधिक विकासकामे व्हावित यासाठी नाशिक महापालिकेने ५००० कोटींचा रिंगरोड व इतर कामांसाठी ११६०० कोटी रुपये असा मिळून १७ हजार कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कुंभेमळ्यासाठी जिल्हास्तर व राज्यस्तराव समित्यांची स्थापना केली असून जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कक्षाचीही स्थापना केली आहे. यामुळे महापालिकेने सिंहस्थ कक्षाकडे हा १७ हजार कोटींचा प्रारुप आराखडा सादर केला.
मागील सिंहस्थात एकट्या महापालिकेचा केवल १०५० कोटींचा आराखडा होता. यावेळी त्या आराखड्यात मोठी वाढ झाल्याने या आराखड्यातील प्रत्येक कामाची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. महापालिकेने सुचवलेल्या प्रत्येक कामाची आपल्या स्तरावरच व्यवहार्यता तपासून उद्देश व गरज स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. सिंहस्थ प्रारुप आराखड्यात ५००० कोटींच्या रिंगरोडव्यतिरिक्त बांधकाम विभागासाठी ३७५० कोटींची तरतूद दाखवली आहे. मागील सिंहस्थात नाशिक महापालिकेने ७ पूल व २२९ किमीचे रस्ते केले होते. यावेळी पुलांची संख्या वाढवून ती २१ करण्यात आली आहे, तर ३५० किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. याशिवाय मागील सिंहस्थात उभारलेल्या साडेसहा किलामीटरच्या गोदाघाटाची डागडुजी करण्याची प्रस्तावित करण्याबरोबरच यावेळी दोन किलोमीटरचे घाट प्रस्तावित केले आहेत. यामुळे या कामांची खरेच किती गरज आहे, याची व्यवहार्यता तपासून त्याचा सुधारित अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. व्यवहार्यता तपासताना सुचवलेल्या रस्त्याचे काम यापूर्वी कधी झाले, त्याची सद्यस्थिती काय आहे, याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती छायाचित्रांसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रस्ता नवीन करणे आवश्यक आहे की केवळ अस्तरीकरण पुरेसे ठरेल याबाबतचा अभिप्रायही नोंदवावा लागणार आहे. तसेच नवीन रस्ते कोणत्या भागासाठी असून सिंहस्थाच्या निमित्ताने त्याची गरज काय, हेही नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गोदावरीवर यापूर्वी बांधलेल्या घाटांची सद्यस्थिती काय आहे ? मागीलवेळी त्याठिकाणी किती भाविक आले, आता नवीन घाटांवर किती भाविक येऊ शकतात, तेथे येण्या-जाण्याच्या रस्त्यांच्या स्थिती याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागवला आहे.
प्रारुप आराखड्यातील विभागनिहाय खर्च
बांधकाम : ३७५० कोटी
पाणी पुरवठा : १००० कोटी
सांडपाणी व्यवस्थापन : २४९१ कोटी
विद्युत : १६७ कोटी
घनकचरा व्यवस्थापन : १५१ कोटी
वैद्यकीय विभाग : ५५५ कोटी
आपातकालीन : ३२ कोटी
उद्यान : ४१ कोटी
आयटी जनसंपर्क : १९ कोटी