Shirdi Airport Tendernama
उत्तर महाराष्ट्र

शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंग; १६ लाख भाविकांना...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२१-२०२२ या वर्षांत ६४०००० नागरिकांन प्रवास केला आहे. तसेच ही विमानसेवा २०१७ मध्ये सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

शिर्डी येथे एक ऑक्टोबर २०१७ रोजी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाले. सुरुवातीपासून या विमानसेवेला साईभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे दरवर्षी या विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोरोनाकाळाचा अपवाद वगळता दरवर्षी वाढतच गेली. कोरोना महामारीच्या काळात शिर्डी विमानतळ जवळपास सात महिने बंद होते. यामुळे २०२०-२१ मध्ये प्रवाशांची रोडावली. कोरोना लाट ओसरल्यानंतर मागील वर्षी १० ऑक्टोबरला साईबाबा मंदिर भाविकांसाठी उघडे झाल्यानंतर भाविकांचा ओघ पुन्हा वाढला असून त्यामुळे पुढील वर्षभरात सहा लाख ४० हजार नागरिकांनी या विमानतळावरून प्रवास केला. सध्या बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, तिरुपती आदी ठिकाणांहुन शिर्डीत येण्यासाठी विमानसेवा आहे. आता शिर्डी-नाशिक- भोपाळ विमानसेवाही सुरू झाली आहे. भविष्यात नाशिक-शिर्डी व तिरुपती अशी धार्मिक दर्शनाची सोय होणारी विमानसेवा उपलब्ध झाल्यास धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळू शकणार आहे.

कोरोनानंतर दप्पट वाढ
कोरेाना महामारी संपल्यनंतर शिर्डी विमानतळावरून ये जार करणाऱ्या विमानांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे. कोरोना काळापूर्वी शिर्डी विमानतळावरून वर्षभरात २१६७ विमानांनी उड्डाण केले होते. त्यानंतर वर्षभरात ही संख्या ५५७० झाली आहे.

नवीन वर्षात नाईट लँडिंग
प्रवाशांच्या मागणीनुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने येथील नाइट लॅडिंगच्या कामास गती दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने धावपट्टीसह प्रकाश योजनेसाठी आवश्यक त्या सर्व कामांची युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. येत्या दोन महिन्यांत ते पूर्णत्वास नेण्याची तयारी सुरू आहे. एव्हिएशनच्या तज्ज्ञ समितीच्या पाहणीनंतर त्यांची परवानगी मिळाल्यास येत्या नववर्षात शिर्डीतून विमानाची नाइट लॅडिंग सुरू होण्याची शक्यता आहे.