Tribal Development Department Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : आदिवासी विकास महामंडळाचा 10 कोटींचा धान खरेदी घोटाळा उघड

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी योजनेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पळशीण येथील धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नावे बोगस धान खरेदी करण्याबरोबरच दहा कोटी रुपयांचे ५२ हजार क्विंटल धान गुदामातून गायब झाल्याचे चौकशी पथकाला आढळले आहे. यामुळे या चौकशी पथकाच्या अहवालानुसार आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी कागदोपत्री धान खरेदी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आदिवासी शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा यासासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी हंगामामध्ये धान खरेदी केली जाते. यासाठी वेगवेगळ्या संस्थांना टेंडर दिले जाते. या धान खरेदीपोटी या संस्थाना आदिवासी विकास महामंडळाकडून कमिशन दिले जाते. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील केंद्रांतर्गत येत असलेल्या पळशीण आदिवासी शेतकरी विकास सहकारी संस्थेला २०२२-२३या वर्षात धान खरेदीचे टेंडर देण्यात आले होते. या संस्थेने २०२२-२३ या वर्षात शेतकऱ्यांच्या नावे बोगस धान खरेदी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चौकशी आदेश दिले होते.

गेल्या महिन्यात चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पळणीण येथील आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच खरेदी केंद्राच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणाच्या आदिवासी व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या धानखरेदीची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीत पळशीण सोसायटीने खरेदी केलेल्या धानांची पाच गुदामांमध्ये तपासणी केली. त्यावेळी कागदपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे या गुदामांमध्ये ६५ हजार ५०० क्विटल धान खरेदी करून ते साठवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात त्यातील ५२ हजार ८४० क्विटल धान गुदामामध्ये आढळूनच आलेले नाही. यामुळे पाच गुदामे सीलबंद करण्यात आली असून तेथील सर्व कागदपत्रे चौकशी समितीने ताब्यात घेतली आहेत.

चौकशी समितीला पळशीण आदिवासी विकास सोसायटीबरोबरच आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, उपप्रादेशिक व्यवस्थापक, विपणन निरीक्षकही दोषी आढळून आले आहेत. या पाच गुदामांमधून गायब झालेल्या धानाच अंदाजे किंमत दहा कोटी रुपये आहे. या संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर लीना बनसोड यांनी प्रादेशिक व्यवस्थापक (जव्हार) विजय गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक (शहापूर) अविनाश राठोड, विपणन निरीक्षक (खर्डी) दीपाली सोनवणे, आदिवासी विकास सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग माडे, सोसायटी सचिव भारत घनगाव, संस्था केंद्राप्रमुख गोकुळ राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.