नाशिक (Nashik) : नगर जिल्हा परिषदेच्या बंधाऱ्यातील पाणी शेतात घुसल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याला सांडवा नसल्याने बंधाऱ्याखाली नदी कोरडी, पण शेजारच्या शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोपरगाव तालुक्याच्या हद्दीवर शहापूर येथे खडकी नदीवर नगर जिल्हा परिषदेने अनेक वर्षांपूर्वी बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याची साठवण क्षमता जवळपास एक टीएमसी आहे. या बंधाऱ्याचा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होत असतो. मात्र, या बंधाऱ्यास सांडवा नाही. यामुळे बंधारा भरल्या नंतर त्यातील पाणी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसत असते. महिनोंमहिने पाणी साचून राहिल्याने शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. यावर्षी सिन्नर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले ओसंडून वाहत असल्याने रांजणगाव, अंजनापुर, बहादरपुर, सायाळे येथून पाणी येऊन खडकी नदीवरील हा बंधारा भरला आहे. नदी प्रवाह सुरूच असून या बंधाऱ्यास सांडवा नसल्याने ते पाणी शेजारच्या शेतांमध्ये घुसले आहे. या बंधाऱ्याचा बांध कोपरगाव तालुक्यात असून सांडवा नसल्याने त्याचे वाढीव पाणी सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसत आहे. सुरुवातीला या बंधाऱ्यास सांडवा होता, पण नंतर साठा वाढवण्यासाठी तो सांडवा बंद करण्यात आल्याने ते वाढलेले पाणी आजूबाजूच्या शेतांत घुसते आहे. यावर्षी पाऊस अधिक असल्याने या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे जवळपास 500 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याला सांडवा तयार करून शेतीचे नुकसान वाचवावे या मागणीसाठी पाथरे खुर्द येथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी सिन्नरच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील बंधाऱ्याला सांडवा नसल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होत आहे. शेतकरी सिन्नर तालुक्यातील असल्याने नगर जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत, असे शिवसेना कार्यकर्ते भरत कोकाटे यांनी सांगितले.