नाशिक (Nashik) : पुणे-नाशिक (Pune-Nashik) रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा, चिंचोली, मुसळगाव आणि मोह या चार उर्वरित गावांचे जमिनींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. वाटाघाटीसाठी भूधारकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी दिली.
पुणे-नाशिक नवीन दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी सिन्नर तालुक्यातील मौजे बारागाव पिंप्री, पाट पिंप्री, दातली, वडझिरे, देशवंडी, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, गोंदे, शिवाजीनगर, मानोरी व नांदूर शिंगोटे या अकरा गावांतील प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या गावांचे दर यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत. या तालुक्यातील उर्वरित या चार गावांचे जिल्हास्तरीय समितीकडून प्राथमिक जिरायत जमिनींसाठी तसेच हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनींसाठी प्रति हेक्टरी प्राथमिक दर निश्चित करण्यात आले आहेत.
सिन्नर तालुक्यातील दर निश्चित करण्यात आलेल्या गावांमध्ये दरानुसार खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी महारेल व जमीन मालकांना पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीचा भूधारकांनी लाभ घ्यावा, असेही गंगाधरन डी. यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे ३० मे रोजी मौजे शिवाजीनगर, नांदूर शिंगोटे, चिंचोली, मानोरी या गावांचे थेट खरेदीने ताब्यात घ्यावयाच्या जमिनींची हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये संबंधित गटाचे शिक्षण कर व रोहयो कर पावती, गुगल अर्थवरील मागील ३ वर्षांची पीकपाहणी करण्यात येणार आहे. पीकपाहणीनंतर बागायतकरिता मूळ जिरायत दराच्या दीडपट व बारमाही बागायतीसाठी दुप्पट असे मूल्यांकन दर निश्चित करण्यात आले आहेत.
दरानुसार संबंधित खातेदारांना जमिनीचा व त्यावरील इतर घटक फळझाडे, वनझाडे, पाइपलाइन, विहीर, बांधकाम, शेड व इतर असा निश्चित करण्यात आलेला एकूण मोबदला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघू पाटबंधारे, नाशिक यांच्यामार्फत भूधारकांना कळविण्यात येणार आहे. ३० मे रोजी थेट खरेदीने ताब्यात घ्यावयाच्या जमिनीची हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित करण्यासाठी मागील ३ वर्षांच्या पीकपाहणीचा अभ्यास करून हंगामी बागायतकरिता मूळ जिरायत दराच्या दीडपट व बारमाही बागायतकरिता दुप्पट असे मूल्यांकन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहेत.
निश्चित केलेले प्रतिहेक्टरी दर :
गावाचे नाव - जिरायत जमिनीचा निश्चित केलेला प्राथमिक दर - जिल्हा समितीने पाचपटप्रमाणे निश्चित केलेला दर
वडगाव पिंगळा - १४ लाख ३२ हजार ९३० - ७१ लाख ६४ हजार ६५०
चिंचोली - ३२ लाख २१ हजार ५५० - १ कोटी ६१ लाख ७ हजार ७५०
मुसळगाव - १६ लाख ६६ हजार २५० - ८३ लाख ३१ हजार २५०
मोह - १४ लाख २५ हजार ७० - ७१ लाख २५ हजार ३५०
जिल्हा समितीने जमिनीचा पाचपटप्रमाणे निश्चित केलेला प्रतिहेक्टरी दर
गावाचे नाव - जिरायत - हंगामी बागायत - बारमाही बागायत
शिवाजीनगर - ५३ लाख १९ हजार ३०० - ७९ लाख ७८ हजार ९५० - ००
नांदूर शिंगोटे - ७२ लाख ३२ हजार ८०० - १ कोटी ८ लाख ४९ हजार २०० - १ कोटी ४४ लाख ६५ हजार ६००
चिंचोली - १ कोटी ६१ लाख ७ हजार ७५० - २ कोटी ४१ लाख ६१ हजार ६२५ - ३ कोटी २२ लाख १५ हजार ५००
मानोरी - ५७ लाख ७९ हजार ६५० - ८६ लाख ६९ हजार ४७५ - १ कोटी १५ लाख ५९ हजार ३००